(टीप : कॉलेजन हे शरिरात आढळणारे सर्वांत सामान्य प्रथिन आहे. हे शरिराच्या अनेक भागांमध्ये आढळते जसे की, चरबी, सांधे आणि अस्थीबंधन इत्यादी. हे आपल्या शरिराचे विविध अवयव एकत्र जोडण्यास साहाय्य करते आणि आपल्या हाडांच्या संरचनेच्या मजबूतीसाठी महत्त्वाचे आहे. या प्रथिनांसाठी पूरक आहार घेणे.)
सध्या केस, त्वचा, सांधे यांच्या आरोग्यासाठी ‘कॉलेजन सप्लीमेंट’चा सुकाळ सध्या चालू आहे. बरेच लोक विशेषतः महिलावर्ग यासाठीचा पूरक आहार न चुकता घेत असतात. विविध संशोधने याविषयी काय सांगतात, ते पाहूया.
‘हार्वर्ड विद्यापिठा’च्या अभ्यासानुसार ‘केस वा त्वचेला ‘कॉलेजन सप्लीमेंट’ने लाभ होतो’, असे सांगणारे ठाम संशोधन उपलब्ध नाही. उपलब्ध संशोधने ही त्याच क्षेत्रातील उत्पादकांच्या प्रायोजकत्वावर झालेली असल्याने त्यात विश्वासार्हता नाही. याखेरीज ही ‘सप्लीमेंटस्’ घेतल्याने त्यातील घटक त्वचा किंवा केसांपर्यंत प्रत्यक्ष पोचतात, असेही निश्चित सांगता येत नाही ! (आता हे सगळे वाचून तसा दावा करणार्या उत्पादनांच्या विरोधात देशातील डॉक्टरांची एखादी खासगी संघटना न्यायालयात का धाव घेत नाही ? असा अडचणीचा प्रश्न मात्र विचारायचा नाही !) अनेक ‘कॉलेजन सप्लीमेंटस्’ हे कवचधारी जलचरांपासून सिद्ध केली जातात. यांत ‘हेवी मेटल’चे (जड धातूचे) प्रमाण अत्याधिक असू शकते आणि ते पडताळून पहाण्याची कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. ‘सांध्यांच्या आरोग्यासाठी ‘कॉलेजन’ उपयुक्त असते’, असे काही संशोधने सांगतात.
आयुर्वेदात ‘कॉलेजन’साठी देण्यात आलेले उपचार
रोचक गोष्ट अशी की, यासंबंधी आयुर्वेदाचे विचार पहाता ‘वातव्याधीमध्ये शरिराचे पोषण करणार्या औषधांनी युक्त मांसरस द्यावा. अस्थी – मज्जेत वात वाढला असता महस्नेह म्हणजेच तेल, तूप, वसा (चरबी) आणि मज्जा यांचे मिश्रण अन् मार बसल्याने इजा झाल्यास वसा, तर मज्जेचे पोषण करण्यास मज्जा वापरावी’, असे संदर्भ मिळतात. बकर्यांपासून मिळणार्या संबंधित अवयवांचा उपयोग करून निर्माण केलेल्या या पाककृतींमध्ये ‘कॉलेजन’चे प्रमाण उत्तम असून त्याचे शरिरात चांगल्या प्रकारे शोषण होते, असेही संशोधने सांगतात. केवळ ‘कॉलेजन’ म्हणूनच नव्हे, तर आयुर्वेदात थेट संदर्भ असल्याने विशेषतः आमच्या गुडघ्याच्या स्नायूंना इजा असलेल्या किंवा कोविड महामारी झाल्यावर देण्यात आलेल्या ‘स्टिरॉईड’ सेवनामुळे ‘अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (ए.व्ही.एन्.)’, म्हणजेच हाडांमधील ऊतीग्रस्त मांसाहारी रुग्णांना ‘पाया सूप’, ‘नल्ली सूप’ हे पर्याय आहारात ठेवण्यास सांगितले जाते. या पाककृती तेल + तूप अशा मिश्रणात आणि अत्याधिक मसाले न वापरता बनवाव्या, जेणेकरून आयुर्वेदाला अपेक्षित महास्नेहाचीही पूर्तता होऊ शकेल अन् अतिरिक्त प्रमाणात पित्त वाढणारही नाही. केस, त्वचा यांच्या आरोग्यासाठी उत्तम उपचार आयुर्वेदात असल्याने एकच एक ‘कॉलेजन’च्या भोवती पिंगा घालत बसण्यात अर्थ नाही. शाकाहारी रुग्णांसाठी औषधांचेच उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने तोही प्रश्न मार्गी लागतो. तात्पर्य इतकेच की, बाजारात काही तरी दिसले म्हणून वहावत जाण्यापेक्षा त्यांसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेदात बहुतेक उत्तरे सापडतात. वैद्यांनीही आजच्या घडीला आजूबाजूला काय चालू आहे, याविषयी अद्ययावत् रहाणे आवश्यक !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.