१. साधिकेला आलेल्या अनुभूतींची धारिका वाचल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावजागृती होणे
‘पूर्वी एकदा एका साधिकेला तिच्या कठीण प्रसंगात देव स्थुलातून साहाय्य करत असल्याची अनुभूती आली. तिला आलेल्या अनुभूतींची धारिका वाचल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावजागृती झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘देवाने असे साधक दिले आहेत; म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो.’’
२. परात्पर गुरु डाॅ. आठवले यांनी ‘साधकांनी बिस्कीटे चांगली बनवली आहेत’, असे सांगणे आणि ते सांगत असतांना त्यांची भावजागृती होणे
वर्ष २०१० मध्ये काही साधकांनी बिस्किटे बनवून परात्पर गुरु डॉक्टरांसाठी पाठवली होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यातील २ – ३ बिस्किटे दिली आणि स्वतःही घेतली. ते मला म्हणाले, ‘‘साधकांनी किती चांगली बिस्किटे बनवली आहेत ना ! त्यांच्यात किती भाव आहे ना ! ’’ ते असे सांगत असतांना त्यांची भावजागृती झाली. ते पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो !’, या वचनाचे मला स्मरण झाले.
३. श्री देव हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावजागृती होणे
वर्ष २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री देव हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांचे आगमन झाले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले प्रवेशद्वाराजवळ गेले होते. त्या वेळी त्यांचे आगमन झाल्यापासून अनुमाने एक घंटा परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ भावजागृती होत होती. परात्पर गुरु डॉक्टरांची इतकी भावजागृती झालेली मी प्रथमच अनुभवत होते.’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.