कलेच्या माध्यमातून साधना करणार्या एका साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘कलाकृती काढलेल्या लादीच्या (‘टाईल’च्या) तुलनेत कलाकृती न काढलेल्या साध्या लादीकडे बघून अधिक सकारात्मक आणि निर्गुणाची स्पंदने जाणवतात. मग ‘अशा कलेचा नेमका उपयोग काय ?’’ साधिकेने विचारलेला हा प्रश्न ऐकून मला त्या संदर्भात मिळालेले सूक्ष्म ज्ञान येथे दिले आहे.
१. ‘साधनेची केंद्रे असलेले आश्रम, जागृत किंवा स्वयंभू देवालये’, अशा सात्त्विक ठिकाणी सात्त्विक कलेची विशेष आवश्यकता नसणे
कला सगुणाशी संबंधित असते. कलेत सात्त्विकता, देवत्व (देवतेचे तत्त्व येणे) आणि निर्गुणत्व असे ३ टप्पे असतात. कला निर्गुणाच्या टप्प्याला गेल्यावर कलाकाराची साधना पूर्ण होते. व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवणार्या सनातनच्या आश्रमासारख्या तीर्थक्षेत्रात सर्वच साधना करणारे असल्याने तिथे सात्त्विकता अन् देवत्व असते. त्यामुळे तेथील साध्या लादीकडे बघून कलाकृती काढलेल्या लादीच्या तुलनेत अधिक सकारात्मक आणि चांगले वाटून त्यात निर्गुण स्पंदने जाणवतात. त्यामुळे ‘असे सात्त्विक आश्रम, जागृत किंवा स्वयंभू देवालये’, अशा सात्त्विक ठिकाणी सात्त्विक कलेची विशेष आवश्यकता नसते.
२. सात्त्विक कलेचा समाजाला होणारा लाभ !
२ अ. सात्त्विक कलाकृती असलेल्या लादीचा साधकांच्या तुलनेत समाजाला अधिक प्रमाणात लाभ होणे : कलियुगातील समाजात, म्हणजे रज-तम प्रधान समाजात रहाणार्या किंवा साधना न करणार्या कुटुंबियांच्या समवेत रहाणार्या प्राथमिक स्तराच्या साधकाच्या घरातील साध्या लादीकडे पाहिले, तर त्यातून सकारात्मक स्पंदने न येता त्रासदायक स्पंदनेच जाणवतात. अशा साधकाने त्याच्या घरात सात्त्विक कलाकृती काढलेल्या लाद्या बसवल्या, तर त्याच्या घराची वास्तूशुद्धी होईल. त्यामुळे साधना करण्यासाठी वास्तू सकारात्मक होऊन त्याला शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी साहाय्य होईल. त्रासदायक स्पंदने असलेल्या वास्तूतील आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी त्या घरात रहाणार्या कुटुंबाची बरीच साधना व्यय होते. ‘तसे होऊ नये’, आणि ‘त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी सात्त्विक कला उपयोगी ठरते. संगीत, चित्रकला, रांगोळी अशा विविध कलांचाही असाच लाभ होतो.
२ आ. सात्त्विक कलेमुळे सात्त्विकतेची आणि मन अन् बुद्धी यांच्या पलीकडील अध्यात्मातील अनुभूती घेता येणे : समाजातील अधिकांश लोकांची साधना नसल्यामुळे त्यांना ‘सात्त्विकता किंवा मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अध्यात्म काय असते ?’, हे ठाऊकच नसते आणि ते अनुभवण्यासाठी त्यांच्याकडे काही स्थुलातील साधन नसते. त्यामुळे अनेक वर्षे ते एकाच आध्यात्मिक स्तरावर अडकून रहातात. या स्थितीत सात्त्विक कला उपयोगी ठरते. सात्त्विक कलेतील सात्त्विकता आणि देवत्व यांमुळे सात्त्विक कलेच्या स्थूल वापरामुळे व्यक्ती चैतन्याच्या संपर्कात येते. यामुळे ‘सात्त्विकता काय असते किंवा मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आध्यात्मिक अनुभूती कशा असतात ?’, हे थोड्या फार प्रमाणात व्यक्ती अनुभवू शकते. मुमुक्षू आणि जिज्ञासू यांनी सात्त्विक कलेचा वापर केल्यावर त्यांच्यात अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करण्याची इच्छा जागृत होऊन त्यांच्याकडून प्रत्यक्ष साधनेला आरंभ होतो. हे सात्त्विक कलेच्या अनेक महत्त्वांपैकी एक महत्त्व !
३. सात्त्विक कलेच्या निर्मितीचा पुढील अनेक पिढ्यांना साधनेसाठी लाभ होत असल्यामुळे कलाकार साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कला ज्ञात असलेले साधक भावभक्तीने साधना करून सात्त्विक कलांची निर्मिती करत आहेत. कलाकार साधक निर्माण करत असलेल्या सात्त्विक कला साधना करणार्या सहस्रों जिवांना सात्त्विकता, चैतन्य आणि भक्ती यांची अनुभूती देणारा अन् मनाला देवाच्या अनुसंधानात ठेवणारा एक स्रोत बनला असून प्रत्यक्ष साधनेसाठी साहाय्यभूत होत आहे. या सात्त्विक कलेचा लाभ या पिढीच्या समवेत पुढच्या पिढीलाही होणार आहे, यात काहीच शंका नाही. त्यामुळे सात्त्विक कलेच्या निर्मितीतून साधक कलाकारांची व्यष्टी आणि समष्टी साधना होऊन त्यांची संतपदाकडे वाटचाल होत आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४, सकाळी ९.४५ ते १०.१५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |