कर्नाटक येथील साधारण ३ सहस्र महिलांच्या लैंगिक छळाचे प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील सहस्रावधी महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे एच्.डी. रेवण्णा यांच्या घरावर धाड घातली. याआधी ३ मे या दिवशी माजी मंत्री आणि आमदार रेवण्णा यांना माजी पंतप्रधान आणि अन् त्यांचे पिता एच्.डी. देवेगौडा यांच्या घरून अटक करण्यात आली होती. त्यांचा मुलगा आणि खासदार असलेले प्रज्वल यांच्यावर महिलांचे ३ सहस्र अश्लील व्हिडिओ बनवण्याचे आरोप असून ते फरार आहेत. सध्या ते जर्मनीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या विरोधात ‘इंटरपोल’कडून ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ काढण्यात आली आहे. एखादी व्यक्ती बेपत्ता असतांना संबंधित देश तिच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाते. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधित व्यक्तीची ओळख किंवा तो वास्तव्य करत असलेल्या स्थानाची माहिती मिळण्यासाठी काढली जाते.
SIT inspects H.D. Revanna's home
Case of sexual harassment of about 3000 women in Karnataka#PrajwalRevannavideo pic.twitter.com/D2zaP5ouvO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2024
१. ३ मे या दिवशी एच्.डी. रेवण्णा यांच्या फार्महाऊसमध्ये अपहरण करून ठेवलेल्या एका महिलेला सोडवण्यात आले. तिची चौकशी चालू असून तिच्या बहिणीने सांगितले की, प्रज्वलला अशी शिक्षा द्यावी की, तो कधीही मान वर करून चालू शकणार नाही. जर त्याला शिक्षा झाली नाही, तर तो पुन्हा असे करेल.
२. लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने पीडितांसाठी ६३६०९ ३८९४७ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. पीडितांना पथकाच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून ते स्वतः जाऊन पीडितांना संपर्क साधतील, असे पथकाने सांगितले आहे.
३. यासह पथकाने लोकांना इशारा देत सांगितले की, रेवण्णा आणि पीडित महिलांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून तुमच्याकडे आले, तर ते पुढे पाठवू नका. त्यांचे प्रसारण करणार्यांवर कारवाई केली जाईल.
कसे उजेडात आले प्रकरण ?
२८ एप्रिलला प्रज्वलच्या विरोधात एका वृद्ध गृहिणीने लैंगिक छळाची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. यानंतर प्रज्वलचे २ सहस्र ९०० हून अधिक व्हिडिओ समोर आले. या व्हिडिओजमध्ये महिला स्वतःला वाचवण्याची विनंती करत आहेत आणि प्रज्वल व्हिडिओ शूट करत आहे, असे दाखवल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रज्वल यांना ३० एप्रिलला जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षातून निलंबित करण्यात आले.