मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्‍या आस्थापनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल ! – दीपक केसरकर, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र

श्री. दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

सिंधुदुर्ग – आम्ही मराठी भाषा धोरण सार्वजनिक केले. अधिकार्‍यांनाही मराठी भाषा येणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्‍या आस्थापनांपुढे महाराष्ट्र झुकणार नाही. अशी आस्थापने महाराष्ट्रात नसली, तरी चालतील. आम्ही नवीन आस्थापने उभी करू. या आस्थापनाची चौकशी करून कायदेशीरदृष्ट्या काय कारवाई करता येईल ? ती निश्चितपणे करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी चेतावणी शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

एका आस्थापनाच्या प्रसारित झालेल्या नोकरीच्या विज्ञापनात ‘The Marathi People are not welcome here’ (मराठी माणसांनी येथे येऊ नये), असे सूत्र लिहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि तेही मुंबईत असलेल्या या आस्थापनाविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अशा प्रकारे पोस्ट प्रसारित करता येते का ? हे मी तपासून पहायला सांगेन. आचारसंहिता चालू असल्याने आमच्यावर बंधने येतात. २० मे या दिवशी मुंबईत लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. तोपर्यंत याविषयी सर्व माहिती काढण्याविषयी सूचना देतो. आस्थापने अशा प्रकारे वागत असतील, तर त्यांना अनुज्ञप्ती (लायसन्स) द्यायची कि नाही, याचा विचार गृहखात्याने करावा, असे मला वाटते.’’