‘जॉर्डनलुका’ नावाच्या ‘ब्रँड’ने (व्यापारी चिन्हाने) एक जीन्स पँट (विजार) बाजारात आणली आहे. ‘फॅशन’ (नवरूढी) म्हणून जीन्सच्या पुढच्या भागावर चेनच्या बाजूला मांड्यांच्या जागी पाण्याचा भिजल्यासारखा डाग या विजारीवर पाडलेला आहे. हा डाग अयोग्य जागी असल्याने तो लघवीने विजार भिजल्यावर जसे दिसेल तसा दिसत आहे. ही नवरूढी म्हणून आली आहे ! आताच्या काळात ‘जितके अव्यवस्थित, जितके अजागळ, जितके तिरके, जितके एकमेकांत मिसळलेले, जितके विकृत तितके चांगले’, अशी बाजारातील स्थिती आहे ! या विजारीच्या कल्पनेची नवरूढी हे त्याच्या टोकाच्या विकृतीचे उदाहरण आहे. नेटकरी सामाजिक माध्यमांवर याची खिल्ली उडवत आहेत. या प्रसारित जीन्सची मूळ किंमत ८११ डॉलर (६७ सहस्र ३१३ रुपये) एवढी आहे. ‘जितके विकृत तितके अधिक पैसे’ असे म्हणायचे का ? अशा वेशभूषेमुळे मनुष्याची बुद्धी विकृत बनते. तो नाना दुष्प्रवृत्तींचा गुलाम बनतो, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या अधीन होतो. शब्द, रंग, रूप, रस, गंध यामध्ये त्या त्या संकल्पनेची शक्ती असते. अशा विकृतीने अयोग्य आणि विकृत शक्ती कार्यरत होते. ती घालणारे आणि पहाणारे या दोघांवर परिणाम करते. विकृती पसरवणार्याला एक प्रकारे समाजाची सात्त्विकता भंग करण्याचे सूक्ष्म पापच लागते.
पाश्चात्त्य कपड्यांशी तुलना केल्यास भारतीय कपडे संपूर्ण अंग झाकणारे, शालीनता देणारे आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सात्त्विक अन् शुद्ध असतात. पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण केल्याने भारतियांची अधोगती होत चालली आहे. आजकालची तरुण पिढी ‘फॅशन’च्या नावाखाली चित्रविचित्र आकृत्या असलेले, चट्टेरीपटेरी, जीन्स-स्ट्रेचेबल्स यांसारखे तोकडे आणि घट्ट बसणारे अशा नाना प्रकाराचे कपडे वापरते. अभिनेत्री उर्फी जावेद ही फॅशन म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर अर्धनग्न, विचित्र कपडे परिधान करत फिरते आणि विकृती प्रसारित करते. काही दिवसांपूर्वी अभिनेते रणवीर सिंग, तर काही वर्षांपूर्वी मिलिंद सोमण यांनी स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. यामुळे आपण स्वतःचे हसे करून घेत आहोत, तसेच त्यामुळे इतरांवरही विकृत मानसिकता बिंबवत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही; पण पैशासाठी सर्व चालू असते. आजकाल विविध प्राण्यांच्या अक्राळविक्राळ आकृत्या असलेले कपडे, भूतांचे भयानक चेहरे असलेले कपडे, विविध ठिकाणी फाटल्यासारखी वेलवीण असलेले, तसेच फाडलेले कपडे इत्यादी सर्रास पहायला मिळतात. अशा कपड्यांच्या आकृतीबंधात घनीभूत झालेल्या त्रासदायक लहरी कालांतराने जीवाच्या वृत्तीवर परिणाम करतात. असे चित्रविचित्र कपडे परिधान करणारा जीव कालांतराने तमोगुणी बनतो. सात्त्विक पोषाखामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, तर असात्त्विक पोषाखामधून नकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सात्त्विकतेचा आग्रह धरावा !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे