‘आफ्टरनून व्हॉईस’चा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अॅवॉर्ड २०२४’ सोहळा
मुंबई, २ मे (वार्ता.) : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘आफ्टरनून व्हॉईस’ या ऑनलाईन वृत्तपत्राचा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अॅवॉर्ड २०२४’ हा १६ वा पुरस्कार सोहळा नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. या वेळी पत्रकारिता, लेखक, भारतीय नृत्य, सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. ‘आफ्टरनून व्हॉईस’च्या संस्थापक संपादक डॉ. वैदेही ताम्हण आणि त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Honour of dignitaries from various fields including Journalism, Writing, Films, Social Work, Indian Dance and more !@Afternoon_Voice's '#NewsmakersAchieversAward 2024' Ceremony
Recipients of the Lifetime Achievement Award
Kathak Dancer Padma Shri Dr. Puru Dadheech, Classical… pic.twitter.com/0xPP2JVGUE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2024
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वेदमंत्रपठणाने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ब्रिटनचे पश्चिम भारतामधील उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार, अमृता फडणवीस, जॉर्जियाचे भारतातील वाणिज्य सल्लागार सत्यिंदर पाल अहुजा, इस्रायलचे भारतातील वाणिज्य सल्लागार कोब्बी शोशनी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पूजा वर्मा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर डॉ. वैदेही ताम्हण यांनी सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. या वेळी पुरस्कारार्थिंनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले. डॉ. पुरु दधिच यांनी मनोगत व्यक्त करतांना विविध क्षेत्रांत जीवन समर्पित करून उल्लेखनीय कार्य करणार्यांच्या या गौरव सोहळ्याविषयी ‘ऑफ्टरनून व्हॉईस’चा समूह आणि डॉ. वैदेही ताम्हण यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आदी मान्यवरही उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्काराचे सन्मानार्थी !• कथ्यक नृत्यांगक पद्मश्री डॉ. पुरु दधिच, मणीपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शना झवेरी, अभिनेत्री सलमा आगा आणि चित्रपट निर्माते के.सी. बोकाडिया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. • ‘जेनेरिक आधार’ या आस्थापनाच्या माध्यमातून नागरिकांना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देणारे अर्जुन देशपांडे यांना ‘उत्कृष्ट उद्योजक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील शेकडो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणारे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचा ‘उत्कृष्ट लोकनेता’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. उदय निरगुडकर यांचा ‘उत्कृष्ट वृत्तसंवादक’ म्हणून गौरव करण्यात आला. • यासह ‘उत्कृष्ट कलाकार’ म्हणून अभिनेत्री अदा शर्मा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कार्यतत्पर अधिकारी’ म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि मुंबई महानगरपालिकेचे अधीक्षक जितेंद्र परदेसी यांचा सन्मान करण्यात आला. • उत्कृष्ट बहुयामी अभिनयासाठी अभिनेत्री मधु आणि अभिनेता दीपक तिजोरी, शीळ वाजवून उत्कृष्ट संगीत निर्माण करणारे शिरीष जोशी, उत्कृष्ट चित्रपट निर्मात्या म्हणून हिना डिसूझा, चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट व्यक्तीमत्त्वासाठी अभिनेत्री रसिका आगाशे, उत्कृष्ट अभिनयासाठी अराहम सावंत यांना सन्मानित करण्यात आले. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांना राजकारणातील चांगल्या कार्यासाठी गौरवण्यात आले. सामाजिक कार्यासाठी डॉ. निआ मद्मपानी, डॉ. तात्यासाहेब लहाने, विक्री व्यवस्थापक (सेल्स मॅनेजर) नीतू जोशी यांचा सन्मान करण्यात आला. |