संपादकीय : विदेशी आस्थापनांचा उद्दामपणा !

‘पब्लिक आय अँड इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क’ या स्विस संस्थेने दावा केला आहे की, लहान मुलांसाठी भारतात विकल्या जाणार्‍या ‘नेस्ले’चे उत्पादन असलेल्या ‘सेरेलॅक’ आणि ‘दूध’ या दोन्हीमध्ये साखरेचा समावेश आहे. युरोप, ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये विकल्या जाणार्‍या ‘बेबी फूड’ उत्पादनांमध्ये ‘नेस्ले’ साखर घालत नाही. या दाव्यानंतर भारतात खळबळ उडाली असून ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ने ‘एफ्.एस्.एस्.आय.’ने ‘सेरेलॅक’चे नमुने चाचणीसाठी गोळा केले आहेत. यातील विशेष म्हणजे ‘सेरेलॅक’ बनवणारी मूळ आस्थापना ‘नेस्ले’ ही स्वित्झर्लंडमधीलच असल्याने या आरोपांना विशेष महत्त्व आहे किंवा या आस्थापनेला ‘घरचा अहेर’च मिळाल्यासारखी स्थिती आहे. नेहमीप्रमाणे ‘सेरेलॅक’ आस्थापनेने आमच्या उत्पादनांमध्ये असलेली साखर नियमांच्या मर्यादेत असल्याचे म्हटले आहे ! ‘नेस्ले’ असो ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ वा ‘ॲमवे’ असो वा अन्य कोणतीही विदेशी आस्थापने ही भारत सोडून अन्य राष्ट्रांमध्ये तेथील नियम-अटी निमूटपणे पाळतात आणि हीच आस्थापने जेव्हा भारतात येतात, तेव्हा मात्र त्याचे पालन करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ! लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक स्तरातील वयोगटाच्या आरोग्याच्या समस्या जर या आस्थापनांमुळे निर्माण होत असतील, तर भारत सरकारला अशा प्रत्येक आस्थापनेविषयी आता प्रसंगी ‘बंदी’सारखा कठोर निर्णय घेण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली आहे !

विदेशी आस्थापनांकडून नियमांचे उल्लंघन !

मूळच्या विदेशी असलेल्या ‘नेस्ले’वर झालेले आरोप हे काही प्रथमच झाले नसून या पूर्वी मूळच्या विदेशी पण भारतीय नाव धारण करून भारतात उत्पादन विकणार्‍या आस्थापनांवर आरोग्याच्या संबंधितील मानांकन आणि नियमांचे पालन न केल्याच्या, तसेच अन्य अनेक गंभीर आरोप झाले आहेत. ‘सेरेलॅक’ची जी उत्पादने जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्ये साखर न घालता विकण्यात येतात, तीच उत्पादने भारतात विक्री होतांना मात्र त्यात ३ ग्रॅम साखर घालून विकण्यात येतात. हा उद्दामपणा या आस्थापनांमध्ये कशामुळे निर्माण झाला ? ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या बेबी पावडरच्या निर्मितीचा परवाना वर्ष २०२३ मध्ये नियमावली आणि मानांकन यांचे पालन करत नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने रहित केला होता. लहान मुलांसाठी असलेली ही पावडर वापरल्याने अमेरिकेत ‘कर्करोग’ होत असल्याचा गंभीर आरोप आहे. अर्थात् नंतर उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली असली, तरी लहान मुलांच्या संदर्भात कर्करोगासारखा आरोप होऊन आस्थापनेची उत्पादने बंद होणे ही गंभीर गोष्ट आहे.

‘एफ्.एस्.एस्.आय.’च्या निर्देशानंतर ‘ॲमवे एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडला’ बाजारातून त्यांची ६ उत्पादने मागे घेण्याचा आदेश देण्यात आला होता. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’नुसार या उत्पादनांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अनुमतीपेक्षा अधिक आढळून आले होते. ‘ॲमवे एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ वर्ष २०१५ मध्ये भारतात २ सहस्र कोटी रुपयांचा व्यवसाय करत होती, ज्यात गंभीर आरोप असणार्‍या ‘न्यूट्रिलाईट’मधील उत्पादनांचा ५५ टक्के सहभाग होता. ‘नेस्ले’ ने वर्ष २०२२ मध्ये भारतात २० सहस्र कोटी रुपयांचे ‘सेरेलॅक’ विकले होते. यावरून ही आस्थापने किती प्रमाणात लाभ मिळवत आहेत, ते लक्षात येते. ॲमवे, ‘सेरेलॅक’, तसेच डायपर बनवणार्‍या आस्थापना त्यांची उत्पादने आता सामान्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग झाल्यासारखा आहे आणि ही आस्थापने कोट्यवधी रुपयांची विज्ञापने करून त्यांची उत्पादने भारतियांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘या सर्व विदेशी आस्थापनांचा उद्दामपणा कधी थांबणार ?’, हा कळीचा प्रश्न आहे. ‘भारतात काहीही केले, नियमांचा कितीही भंग केला, तरी येथे खपवून घेतले जाते’, असा समज या आस्थापनांना झाला आहे. हा दूर करण्यासाठी येथील व्यवस्थेकडून प्रथम प्रयत्न झाले पाहिजेत. ‘भारतीय नियमांचे पालन केले नाही, तर बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल’, हे कृतीतून अशा आस्थापनांना दाखवून द्यायला हवे. अशानेच या आस्थापना वठणीवर येतील.

भारतीय जीवनपद्धत अवलंबणे आवश्यक !

आपण जे अन्न खातो, त्यापासून पुढे मन बनते. त्यामुळे हे अन्न जेवढे सात्त्विक तितकी पुढची निर्माण होणारी पिढी कार्यक्षम असणार आहे. पूर्वी ‘सेरेलॅक’सारखे असे काहीच नसे, तर लहान मुलांनाही भरड धान्य, घरगुती जनमगुट्टी, मातेचेच दूध यांसारखे भारतीय संस्कृतीला आवश्यक आणि अपेक्षित घटकच दिले जायचे. मुलांच्या खाद्यपदार्थात त्या त्या ऋतूंनुसार हळीवाचे लाडू, विविध प्रसादांमध्ये खडीसाखर, बदाम, खारीक असे. त्यामुळे ही मुले ही केवळ सुस्वभावी नाही, तर पुढे जाऊन बुद्धीवान बनत. याउलट आताची बहुतांश बालके, मुले ही ‘सेरेलॅक’साखरे पदार्थ खाऊन, पाकीटबंद पदार्थांच्याच रेलचेलपणामुळे लहानपणापासूनच स्थूल, आळशी, चिडखोर आणि संयम नसणारी बनत आहेत. या संदर्भात ब्राझिलमधील ‘फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पॅराबा’ येथील पोषण विभागातील प्रा. रॉडिओ वियाना म्हणाले, ‘‘लहान मुलांना दिल्या जाणार्‍या अन्नामध्ये साखर घालणे म्हणजे व्यसनाप्रमाणे आहे. मुले गोड चवीचे व्यसन करतात आणि त्यांना अधिक गोड पदार्थ खावेसे वाटतात. यामुळे अनेक रोगांसमवेत लहानपणापासूनच लठ्ठपणा वाढतो. इतकेच नाही, तर मधुमेह आणि उच्च रक्तदाबही निर्माण होतो.’’ जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘लहान मुले जर साखरेच्या संपर्कात आली, तर त्यांना आयुष्यभर साखरेची उत्पादने खाण्याची सवय लागते ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो’, असे नमूद केले होते. त्यामुळे वर्ष २०२२ मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये साखर आणि गोड पदार्थ घालण्यास बंदी घातली होती. इतक्या स्पष्ट शब्दांत चेतावणी देऊनही जर ‘नेस्ले’ आणि तत्सम आस्थापने भारतातील लहान मुलांच्या आरोग्याची कोणतीच काळजी न घेता उत्पादने बनवत असतील, तर भारतीय आरोग्य विभागानेही त्यांना वठणीवर आणले पाहिजे.

याचसमवेत भारतातील पाल्यांनी  ‘सेरेलॅक’, ‘जॉन्सन बेबी पावडर आणि ऑईल’, हवाबंद पदार्थ यांच्यामागे न लागता समृद्ध अशा आयुर्वेदीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. असे केले, तर मुलांचे आरोग्य सदृढ तर होईलच, तसेच कोट्यवधी रुपयांचे परदेशी चलनही वाचेल !

‘नेस्ले’सारख्या विदेशी आस्थापनांच्या उत्पादनांवर भारतात बंदी घातली, तरच त्या वठणीवर येतील !