डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांना रामनाथी आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

डोंबिवली (ठाणे) येथील श्री. योगेश सोवनी यांनी तबनलावादनात अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. ते तबल्याचे शिकवणीवर्ग घेतात, तसेच ते अनेक ठिकाणी गायनाच्या कार्यक्रमांत तबलावादनाची साथ देतात. ते एकल (सोलो-टीप) तबलावादनाचे कार्यक्रमही प्रस्तुत करतात. १८.८.२०२३ ते २२.८.२०२३ या कालावधीत ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. तेव्हा त्यांना रामनाथी आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे आणि ध्यानमंदिराविषयी आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे दिल्या आहेत.

(टीप – ‘कार्यक्रमात एकट्यानेच तबलावादनातील ‘पेशकार, कायदा, रेला, चक्रधार इत्यादी विविध प्रकार सादर करणे’ याला ‘एकलवादन’ किंवा ‘सोलोवादन’, असे म्हणतात.’ – सौ. अनघा जोशी (बी.ए. संगीत))

१. रामनाथी आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे

१ अ. ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, असे कळल्यावर तेथील चैतन्यमय वातावरणाच्या आठवणी जागृत होणे : ‘मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, असे कळल्यावर तेथील चैतन्यमय वातावरणाच्या माझ्या आठवणी जागृत झाल्या. याआधीही मी ५ – ६ वेळा रामनाथी आश्रमात येऊन गेलो आहे. त्या वेळच्या चांगल्या आठवणी अजूनही माझ्या स्मरणात आहेत.

१ आ. रामनाथी आश्रमात प्रवेश करताच श्री सिद्धिविनायकाचे तेजोमय दर्शन होऊन डोळ्यांचे पारणे फिटणे : आश्रमाच्या मुख्य फाटकामधून प्रवेश केल्यावर मला मंदिरातील श्री सिद्धिविनायकाच्या तेजोमय रूपाचे दर्शन झाले. श्री सिद्धिविनायकाचे ते तेजस्वी रूप मी कधीच विसरू शकणार नाही. ते तेज पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.

१ इ. रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे व्यक्तीला पुनःपुन्हा येथे यावेसे वाटणे : ‘आश्रमाच्या पवित्र वास्तूत येऊन ती व्यक्ती बाहेर कुठेही गेली, तरी तिला पुन्हा येथे यावे’, असे वाटते. मी आश्रमातून माझ्या गावी परत गेल्यावर मला ‘या चैतन्यमय वास्तूत पुन्हा यावे’, असे वाटते; कारण येथे मनाला शांती मिळते.

श्री. योगेश सोवनी

२. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिराच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आश्रमाच्या दिव्य आणि सात्त्विक ध्यानमंदिरात नामजप करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.

२ अ. मला ध्यानमंदिरातील वातावरण ‘शांत, प्रसन्न, रम्य आणि अद्भुत आहे’, असे जाणवले.

२ आ. नामजप करतांना मला ध्यानमंदिराला लागून असलेल्या परिसरात सिमेंटच्या रंगाची एक मोठी समई सतत दिसत होती आणि एक संगमरवरी मोठे शिखर दिसले.

२ इ. सुगंध येणे : ध्यानमंदिरात पुष्कळ सुगंध दरवळत होता; मात्र ‘तो सुगंध कशाचा ?’, ते मला कळले नाही.

२ ई. ध्यानमंदिराचे जाणवलेले सामर्थ्य ! : ध्यानमंदिरात बसल्यावर सकारात्मक ऊर्जा मिळवायला काहीच करावे लागत नाही. ‘तिथे नुसते बसल्यावरही व्यक्ती एकाग्र होते’, एवढे सामर्थ्य आणि ऊर्जा ध्यानमंदिरात आहे !

२ उ. स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडणे : दुसर्‍या दिवशी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला ‘मी कुठे आहे ?’, याचे भान नव्हते. ‘मी एका अंधार असलेल्या गुहेत बसलो असून समोर भरपूर उंच झाडे आहेत. अकस्मात् माझ्यावर सूर्याची किरणे पडून मला गुलाबी आणि निळसर प्रकाश दिसला.’ तेव्हा ‘मी माझ्यात नव्हतोच’, असे मला वाटले.

२ ऊ. नामजप करायची ओढ लागणे : श्रावण मासात पवित्र गोष्टी करतात, तसा मी रामनाथी आश्रमात येऊन ध्यानमंदिरात नामजप करत होतो. ध्यानमंदिरात बसून नामजप केल्यापासून मला नामजप करायची ओढ लागली आहे. माझ्यासाठी ही सुखकारक आणि आनंददायी गोष्ट होती.

२ ए. ध्यानमंदिरात बसल्यावर व्यक्ती अंतर्मुख होणे : ‘निसर्गाच्या कुशीतील भव्य-दिव्य वास्तू, ध्यानमंदिरातील ऊर्जा आणि देवत्वाचा होणारा साक्षात्कार’, अशा येथील अनेक गोष्टी माणसाला अंतर्मुख करतात. त्यामुळेच इथे व्यक्ती एकाग्रतेने नामजप करू शकते आणि त्यामुळेच ‘ती शांत अन् आनंदी होते’, असे मला वाटते.

३. जाणवलेली अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

३ अ. तबलावादनाच्या प्रयोगाचा कक्ष, म्हणजे ‘संगीताचे पूजाघर आहे’, असे वाटणे : तबलावादनाच्या प्रयोगासाठी मार्गिकेतून कक्षाकडे जातांना मी ‘भव्य-दिव्य अशा दालनातून दरबारात जात आहे. तेथील कक्षात गेल्यावर मला तो कक्ष ‘संगीत किंवा वादन यांचे पूजाघर आहे’, असे वाटले.

३ आ. रामनाथी आश्रमातील दैवी साधनेमुळे कलाकार सिद्ध होणे : आश्रमात आल्यावर व्यक्तीतील कलेला खर्‍या अर्थाने आकार मिळतो. ‘येथील दैवी साधनेमुळे कलाकार सिद्ध होतो’, हे मी आश्रमात आल्यावर अनुभवले आहे. त्यामुळे मनाला पुन्हा आश्रमात यायची ओढ लागते.’

– श्री. योगेश सोवनी, तबलावादक (अलंकार), डोंबिवली (जि. ठाणे) (३१.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक