Rain 2024 : या वर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – ‘ला निना’ वादळाच्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक आणि दीर्घ काळाच्या सरासरीच्या (८७ सें.मी.) १०६ टक्के असेल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम्. रवीचंद्रन यांनी दिली. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती गेल्या ९ वर्षांच्या आकडेवारीवरून चांगली असणार, असे  सांगितले. तसेच देशात ८० टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे.

महोपात्रा यांनी सांगितले की, हवामान विभागाने गेल्या वर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता, तसेच यंदा मान्सूनच्या आरंभीच्या तुलनेत ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे महोपात्रा यांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी वादळाची शक्यता नाही; पण उष्णतेची लाट येऊ शकते. त्याविषयी आयोगाला माहिती दिली जाईल. हवामान विभागाने मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल स्पष्ट संकेत दिले नाहीत. हा भाग देशाचा ‘मुख्य मान्सून विभाग’ मानला जातो. येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे.