पुणे येथे उजनी धरणातील पळसनाथ मंदिर भाविकांना दाखवण्यासाठी मासेमारांची विनामूल्य सेवा !

पळसदेव (जिल्हा पुणे) – उजनी (यशवंत सागर जलाशय) धरणातील पाणीसाठा अल्प झाल्यामुळे पळसनाथ देवाचे मंदिर पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांना पाण्यातील मंदिरापर्यंत जाण्यासाठी तेथील मासेमार अत्यल्प पैसे घेऊन सेवा देत होते; परंतु १४ एप्रिल या दिवशी झालेल्या पळसनाथ देवाच्या यात्रेपासून भाविकांना विनामूल्य सेवा देण्याचा मासेमारांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाविकांकडून उत्साही स्वागत करण्यात येत आहे.

उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पळसनाथ मंदिरासह राजवाडे, पूल पाण्याखाली गेले आहेत. सध्या धरणातील पाणीसाठा अल्प झाल्याने हे सर्व उघडे पडले असून ते पहाण्याचा दुर्मिळ योग भाविकांना येत आहे. त्याचा लाभ घेत अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. येणार्‍या भाविकांची सेवा व्हावी म्हणून मासेमारांनी विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला.