सौदी अरेबियात रहीमची मृत्यूदंडाची शिक्षा रहित होण्यासाठी केरळच्या जनतेने एकत्र केले ३४ कोटी रुपये !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील कोळीकोडचा रहिवासी असलेल्या अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीला सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. ती रहित करण्यासाठी केरळसह जगभरातील केरळी लोकांनी तब्बल ३४ कोटी रुपयांची रक्कम लोकवर्गणीद्वारे जमा केली आहे.

१. रहीम हा १८ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या कारागृहात आहे. वर्ष २००६ मध्ये रहीमच्या गाडीत १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या मृत्यूस उत्तरदायी धरण्यात आले होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये सौदी अरेबियाच्या न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि पुढे तेथील सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.

२. गेल्या वर्षी त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या सुटकेच्या बदल्यात ३४ कोटी रुपयांचा ‘ब्लड मनी’ (आरोपीची शिक्षा रहित करण्यासाठी पीडिताच्या कुटुबियांना देण्यात आलेला) निधी देण्याची सिद्धता दर्शविली. हा निधी देण्यासाठी मध्यस्थांनी १६ एप्रिल पर्यंतची समयमर्यादा देण्यात आली होती.

३. सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाची शिक्षेपासून सुटका करून घ्यायची असल्यास ‘ब्लड मनी’चा पर्याय आरोपीसमोर असतो. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी ‘ब्लड मनी’ची रक्कम स्वीकारल्यास आरोपीला दोषमुक्त करण्यात येते. आरोपीला क्षमा करण्याच्या बदल्यात ही रक्कम देण्यात येते.

४. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ ५ कोटी रुपये जमा होऊ शकले होते. त्यानंतर यासंदर्भात सर्वत्र जागृती करून ३४ कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. यांत विविध राजकारणी, प्रतिष्ठित लोक आणि परदेशात रहाणार्‍या केरळी जनतेने यांचा सहभाग आहे.

(म्हणे) ‘कोणतीही धार्मिक विचारसरणी आमच्या बंधुभावाला खिंडार पाडू शकत नाही !’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

रहीमऐवजी एखाद्या हिंदूच्या संदर्भात असे घडले असते, तर असा बंधूभाव दाखवण्यात आला असता का, हा पहिला प्रश्‍न ! ‘हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम’, अशी भारतीय साम्यवादाची व्याख्या असल्याने विजयन् यांनी पीडित हिंदूच्या रक्षणार्थ मुसलमानांना आवाहन केले असते का, हा दुसरा प्रश्‍न !

पिनराई विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी फेसबुकद्वारे साहाय्याचे आवाहन करत म्हटले की, अब्दुल रहीमची सुटका करण्यासाठी जगभरातील केरळी नागरिक एकवटले. केरळच्या जनतेने घेतलेला हा पुढाकार प्रेमाचे मूर्तीमंत उदाहरणच होय. केरळमध्ये बंधुभाव रुजलेला आहे, हे यातून दिसते. कोणतीही धार्मिक विचारसरणी आमच्या बंधुभावाला खिंडार पाडू शकत नाही !