छत्रपती संभाजी महाराजांच्या करण्यात आलेल्या नृशंस छळाचा ऐतिहासिक दस्तऐवज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात सापडला !

छत्रपती संभाजी महाराज

पुणे – भारत इतिहास संशोधक मंडळात नुकतीच पाक्षिक सभा पार पडली. यात  औरंगजेबाच्या दरबारातील अधिकृत कागदपत्रांतील ‘जवाबित-ए-आलमगिरी’ या अप्रकाशित साधनात (मजकुरात) औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या निर्घृण आणि नृशंस छळाचा अन् हत्येचा अप्रकाशित पुरावा सादर करण्यात आला. सदर दस्तऐवज प्रसिद्ध फारसीतज्ञ राजेंद्र जोशी यांना ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात आढळून आला. तो त्यांनी मंडळातील विद्यार्थ्यांकडे सुपुदर्र् केला. या दस्ताऐवजावरील संशोधन मंडळातील फारसी भाषेचे अभ्यासक सत्येन वेलणकर, पराग पिंपळखरे, रोहित सहस्रबुद्धे, मनोज दाणी, गुरुप्रसाद कानिटकर आदींनी केले.

ते प्रातिनिधिक स्वरूपात पराग पिंपळखरे यांनी सभेमध्ये मांडले. या संदर्भात श्रोत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना त्यांच्यासह गुरुप्रसाद कानिटकर आणि सत्येन वेलणकर यांनी समर्पक उत्तरे दिली. यासाठी फारसी तज्ञ राजेंद्र जोशी यांनी स्वत:च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे ! – इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे

इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे

मंडळाचे चिटणीस आणि इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे म्हणाले की, इतिहास संशोधनामध्ये विरुद्ध बाजूच्या पुराव्यांनाही तितकेच महत्त्व असते. हा पुरावा प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील सरकारी कामकाजातील कागदपत्रांचा असल्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी शंका घेण्यास वाव नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे. बलकवडे यांनीही मंडळातील सर्व अभ्यासकांचे कौतुक केले. हा दस्तावेज पूर्णपणे उपलब्ध करून पुस्तकरूपाने प्रकाशित करू, अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थितांना दिली.