महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ५ दिवस सुटी !

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी घोषित करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसाठी ही सुटी असणार आहे. ज्या आस्थापनांना अतीआवश्यक कामामुळे सुटी देणे शक्य नाही. त्यांनी मतदानापुरती काही घंटे मतदारांना सुटी देणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात होणार आहे. दुसर्‍या टप्प्याचे मतदान २६ एप्रिल या दिवशी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघात होणार आहे. तिसर्‍या टप्प्याचे मतदान ७ मे या दिवशी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहिल्यानगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघात होणार आहे. शेवटच्या म्हणजे ५ व्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघात होणार आहे.