Shahnawaz Hussain : मुसलमानांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवावा ! – भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमध्ये भाजपने उमेदवारी दिली नसल्याने मुसलमानांमध्ये नाराजी आहे. ती नाराजी दूर करतांना भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले की,  लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यापेक्षा राबवल्या जात असलेल्या कल्याणकारी योजनांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे मुसलमानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवावा. ‘सबका साथ सबका विकास’ या ध्येयानुसार पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भाजपने लोकसभेसाठी केरळमधील कालिकट आणि लक्षद्वीप येथे मुसलमान  उमेदवार उभे केले आहेत.

शाहनवाज हुसेन पुढे म्हणाले की, संसदेत अधिक संख्या असणे हे समाजाच्या कल्याणाचे प्रतीक असू शकत नाही. केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव असतांना मुसलमान मंत्र्यांची संख्या सर्वाधिक होती; मात्र त्याच काळात बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. (स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशात शासनकर्ते हिंदूच आहेत; मात्र तरीही हिंदूंवर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदु धर्मावर आघात होत आहेत. याविषयी हिंदूंच्या नेत्यांनी बोलायला हवे ! – संपादक)

माझ्यावर अन्याय झालेला नाही ! – हुसेन

हुसेन यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याच्या चर्चेवरून ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला, असे मला वाटत नाही. मी ६ वेळा खासदार झालो. मी केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्वांत तरुण मंत्री होतो. राज्य विधी मंडळातही मला स्थान मिळाले होते. आताही पक्षाने माझ्याकडे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून दायित्व दिलेले आहे.