सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश !
(व्हीव्हीपीएटी म्हणजे ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ यंत्र. याद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य उमेदवारालाच गेले आहे, हे दिसते. )
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीच्या वेळी ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’मधील (व्हीव्हीपीएटीमधील) सर्वच पावत्यांची मोजणी करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. याआधी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कोणतेही ५ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि ‘व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची पडताळणी केली जात होती. सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. ‘एकोमागमाग क्रमाने व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी केल्यास मतमोजणीला विलंब लागू शकतो’, या निवडणूक आयोगाच्या युक्तीवादाला यात आव्हान देण्यात आले. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील निर्देश दिले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी अधिक अधिकारी तैनात केले गेले आणि एकाच वेळी व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी केली गेली, तर संपूर्ण व्हीव्हीपॅट पडताळणी अवघ्या ५-६ घंट्यात पूर्ण होऊ शकेल, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.
काय आहे व्हीव्हीपॅट यंत्र ?
व्हीव्हीपॅट यंत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या ‘बॅलेट युनिट’ जोडलेले असते. जेव्हा मतदार मतदान यंत्राद्वारे मतदान करतो, त्याची मतपत्रिका व्हीव्हीपॅटमध्ये जमा होते. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलेले असते, त्या मतदाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये दिसते. म्हणजेच त्याचे मत योग्य व्यक्तीला गेलेले आहे, याची मतदारांना निश्चिती व्हावी म्हणून व्हीव्हीपॅट यंत्र असते. मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्रामधील मतपत्रिका केवळ पहाता येते. ७ सेकंद झाल्यानंतर ही मतपत्रिका आपोआप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये जमा होते.