बेळगाव – ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ने लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून उमेदवार निवडीसाठी २१ जणांची विशेष समिती गठीत करण्यात येणार आहे. गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समितीने लाखापेक्षा अधिक मते मिळवल्याने समितीने मराठी भाषिकांची मते कायम रहावीत, यासाठी आगामी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा मंदिर सभागृहात शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी शुभम शेळके यांनी ‘निवडणुकीविषयी समिती जो निर्णय घेईल, तो मान्य असेल’, असे सांगितले. अमित देसाई यांनी ‘निवडणुकीतून मराठी अस्मिता दाखवूया’, असे आवाहन केले, तर रमाकांत कोंडुस्कर यांनी ‘मराठी माणूस आणि शेतकर्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी ही निवडणूक लढवावीच लागेल’, असे मत व्यक्त केले.