US Kejriwal Arrest : (म्हणे) ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे !’ – अमेरिका

भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर व देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

वॉशिंग्टन (अमेरिका) – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून अमेरिकेने केलेल्या विधानावरून भारताने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी ग्लोरिया बर्ना यांना मंत्रालयात बोलावून जाब विचारला होता आणि भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये हस्तक्षेप न करण्याची जाणीव करून दिली होती; मात्र त्यानंतरही अमेरिकेने पुन्हा एकदा या प्रकरणात विधान केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि यामुळे कुणालाही कोणतीही अडचण येऊ नये. आम्हाला आशा आहे की, या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल.

१. यासह अमेरिकेने काँग्रेस पक्षाशी संबंधित बँक खाती गोठवण्याविषयी म्हटले की, काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे, ‘कर प्राधिकरणाने त्यांची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक प्रचारात अडचणी येऊ शकतात.’

२. ग्लोरिया बर्ना यांना जाब विचारण्याच्या प्रकरणी मिलर यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले की, मी या चर्चेची माहिती देऊ शकत नाही.

३. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत २६ मार्चच्या रात्री अमेरिकेने निवेदन दिले होते की, केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावर आमचे सरकार लक्ष ठेवून आहेे. याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. या काळात कायदा आणि लोकशाही यांच्या मूल्यांचे पालन केले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेला दोन वेळा सांगूनही कळत नाही, असे नाही, तर केजरीवाल प्रकरणातून भारतावर जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. यामागे खलिस्तानी आहेत का ? याची चौकशी केली पाहिजे आणि अमेरिकेचे आता नाक दाबले पाहिजे !
  • झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर न बोलणारी अमेरिका देहलीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केल्यावर भारताला जाब विचारते. ‘केजरीवाल यांना अटक केल्यामुळे अमेरिका अस्वस्थ का आहे ?’, याचे अन्वेषण व्हायला हवे !