‘२३.१.२०२४ च्या रात्री ९.१५ वाजता मी श्रीविष्णुवरील एक भक्तीगीत ऐकत होते. तेव्हा २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आले आणि अकस्मात् सूक्ष्मातून मला पुढील दृश्ये दिसली.
१. श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या चरणकमलातून निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडून तो श्रीरामलोकापर्यंत जाणे आणि तिथे राजा दशरथ अन् श्री हनुमान यांचे दर्शन होणे
सर्वप्रथम मला श्री रामलल्लाच्या मूर्तीचे चरणकमल दिसले. त्यातून निळ्या रंगाचा प्रकाशझोत निघून तो पुष्कळ वर गेला. त्यात मला श्रीरामलोकाचे दर्शन झाले. तो लोक पुष्कळ दैदीप्यमान होता. त्यात असंख्य पांढरे दैवी कण होते. तिथे केवळ ‘निर्गुण तत्त्वाच्या लहरीच होत्या’, असे मला जाणवले. मी तो लोक पहात पुढे जाऊ लागले, तसा तो मोठा होत होता आणि शेवटी तो निराकार झाला. ‘तिथे प्रभु श्रीरामांची वानरसेना सूक्ष्म रूपात आहे’, असे मला जाणवले. श्रीराम लोकात मला ‘राजा दशरथ आणि श्री हनुमान’ या दोघांचे रूप दिसले. त्यांना पाहून माझा भाव जागृत झाला.
२. ‘श्री रामलल्लाला अर्पण केलेले कमलपुष्प स्थुलातून श्री रामलल्लाच्या चरणी आणि सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण झाले’, असे दृश्य दिसणे
वरील दृश्य दिसल्यानंतर मला श्री रामलल्लाच्या पूजेच्या वेळचे दृश्य दिसले आणि ‘पूजेच्या वेळी श्री रामलल्लाला अर्पण केलेले कमलपुष्प स्थुलातून श्री रामलल्लाच्या चरणी आणि सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाले’, असे जाणवले. २२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी भूदेवी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीदेवी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित होत्या. त्या प्रसंगी ‘स्थुलातून भूदेवी आणि श्रीदेवी अयोध्येत होत्या; मात्र सूक्ष्मातून त्यांनी रामनाथी आश्रमात सच्चिदानंद गुरुदेवांच्या चरणी कमलपुष्प अर्पण केले’, असे मला जाणवले.
३. ‘श्री रामलल्लाच्या पूजेच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये ४५ टक्के श्रीरामतत्त्व, १५ टक्के श्रीकृष्णतत्त्व आणि ४० टक्के श्रीविष्णुतत्त्व कार्यरत होते’, असे मला जाणवले.
४. सोहळ्याच्या वेळी सर्वच देवता भावस्थितीत असणे आणि साधिकेला स्वतःच्या हृदयमंदिरात श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सुंदर रूप दिसणे
श्री रामलल्लाच्या पूजेच्या वेळी सर्व देवीदेवता आणि ऋषिमुनी यांनी कलियुगातील नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर पुष्पवृष्टी केली. तेव्हा सर्व देवता भावस्थितीत होत्या. काही देवतांची भावजागृती झाली होती, काही देवता शरणागतभावात होत्या, तर काही देवता भगवंताच्या मूर्तीकडे पाहून अत्यंत आनंदी झाल्या होत्या. सर्वच देवता त्या सोहळ्याचा आनंद अनुभवत होत्या. हे दृश्य पहातांना माझ्याही आनंदात पुष्कळ वाढ झाली आणि मला माझ्या हृदयमंदिरात ‘श्रीरामस्वरूप गुरुदेवांचे सुंदर रूप दिसले.’ त्यामुळे माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
५. कृतज्ञता
‘हे भगवंता, तुझ्याच अनंत कृपेमुळे मला सूक्ष्मातून तुझे दर्शन झाले आणि हा दिव्य सोहळा अनुभवता आला’, यासाठी तुझ्या चरणी अनंत कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (८.२.२०२४)
|