कर्नाळा गडाची स्वच्छता करून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी घेतले श्री कर्नाईमाता देवीचे आशीर्वाद !

हिंदु जनजागृती समितीची गडदुर्ग मोहीम !

गडावरून कचरा खाली पायथ्याशी घेऊन आलेले युवा कार्यकर्ते

पेण, २१ मार्च (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गडदुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला. जमलेल्या युवकांना साधना आणि गुरु यांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे गुण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेत युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

गडावर येणार्‍या लोकांनी इतस्ततः फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टने अशा स्वरूपात तीन गोण्या भरून प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेऊन मोहिमेची सांगता झाली.

वैशिष्ट्यपूर्ण घटना !

. गड पहाण्यासाठी आलेली मुले चित्रपटाची गाणी म्हणत जात होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी सागितले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या पवित्र गडावर चित्रपटातील गाणी म्हणत जाण्यापेक्षा महाराजांशी संबंधित घोषणा द्या. त्यातून तुम्हाला शक्ती मिळेल.’’ मुलांनी ते मान्य करत तशी कृती केली.

. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करतांना तेथील उपाहारगृहात काम करणार्‍या महिलांनी येऊन त्याविषयी चौकशी केली. एरव्ही त्या उपाहारगृहातून काही खाद्यपदार्थ मागवले, तरच तेथे बसू देतात; पण येथे जमलेल्या युवकांना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करतांना पाहून संबंधित महिलांनी युवकांना उपाहारगृहात बसून घरून आणलेले जेवण जेवण्याची अनुमती दिली.