छत्रपती संभाजीनगर – राज्यात सातत्याने संभाजीनगर बसस्थानक विभाग अव्वल ठरला आहे. सध्या पुणे-संभाजीनगर मार्गावर १० ‘ई-शिवाई’ चालू असून संभाजीनगर विभागासाठी २१८ बस मिळणार असून ‘सिडको’साठी ७८ ‘ई-शिवाई’ लवकरच येणार आहेत. या बसगाड्या साधारणत: जून मासात विभागाला प्राप्त होतील, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.
१. सध्या शाळा चालू असून त्यांच्या परीक्षाही चालू आहेत. १० एप्रिलपासून एस्.टी.चा उन्हाळी हंगाम चालू होत आहे. त्यासाठी विभागाने जय्यत सिद्धता केली असून १ लाख ९१ सहस्र किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे नियोजन विभागाने केले आहे. जालना, बीड, अकोला यांसह अनेक ठिकाणी अधिकच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
२. मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती सुधारण्यासाठी हे स्थानक ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’, या तत्त्वाखाली विकसित करण्यात येणार आहे.
३. एस्.टी.ला जो नफा मिळतो, त्या नफ्यामध्ये राज्यातील ३१ विभागांमध्ये संभाजीनगर विभाग हा दुसर्या क्रमांकावर आहे. यात किती किलोमीटर एस्.टी. धावते ? उत्पन्न, इंधन यांसह २० विविध गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व श्रेय चालक, वाहक, कर्मचारी, वाहतूक पर्यवेक्षक यांचे आहे. यात गेल्या एप्रिलपासून ११ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न संभाजीनगर विभागाला मिळालेले आहे.
पैठण येथील नाथषष्ठी यात्रेसाठी ८० अधिक बसचे नियोजन केले असून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यांसाठी एस्.टी. कटीबद्ध आहे. |