हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेच्या अंतर्गत पन्हाळगडाची स्वच्छता, श्रीकृष्ण मंदिराची स्वच्छता आणि व्याख्यान !

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ मार्च या दिवशी ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून पन्हाळ गडावर एक दिवसीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. समितीचे श्री. प्रथमेश गावडे आणि कु. नयना दळवी यांनी सहभागी युवकांना पन्हाळ गडावरील विविध ऐतिहासिक ठिकाणे दाखवून तेजस्वी इतिहासाची माहिती दिली. सहभागी युवकांनी गडावर स्वच्छता करत प्लास्टिकच्या बाटल्या गोळ्या केल्या. युवकांनी गडावर असलेल्या विश्वासराव गायकवाड आणि खंडेराव गायकवाड यांच्या समाधीची स्वच्छता केली, पुरातन अशा श्रीकृष्ण मंदिराची स्वच्छता केली. या मोहिमेत जिल्ह्यातील ४० युवक-युवती सहभागी झाले होते.

पन्हाळागड येथील मोहिमेच्या प्रसंगी उपस्थित असणारे युवक
पन्हाळगड येथील मोहिमेच्या प्रसंगी श्रीकृष्ण मंदिराची स्वच्छता करतांना युवक-युवक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तरुणांनी राष्ट्र-धर्म कार्यात झोकून द्यावे ! – आनंदराव काशीद

या मोहिमेच्या समारोपप्रसंगी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे वीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद यांनी युवकांना मार्गदर्शन केले. श्री. काशीद म्हणाले, ‘‘पांडव अज्ञातवासात असतांना त्यांचे वास्तव्य याच परिसरात होते. या गडावर भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांची भेट झाली आहे. पंचगंगा नदीमधील गुप्त असणार्‍या सरस्वती नदीचा उगम याचा गडावर होतो. त्यामुळे या गडाला कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट याच गडावर झाली. ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते, अशा गडाच्या भूमीला स्पर्श करायला मिळणे, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तरुणांनी राष्ट्र-धर्म कार्यात झोकून द्यावे.’’

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.