रत्नागिरी – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो. याचे औचित्य साधत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये नाट्यशास्त्र प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत पुण्यस्मरण कार्यक्रम झाला.
यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, नाट्यशास्त्र प्रशिक्षण मार्गदर्शक डॉ. शशांक पाटील प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास सौ. अनघा नागवेकर यांनी उलगडून दाखवला. महाराजांची महती याविषयी डॉ. सुधांशू मेहता यांनी लिहिलेल्या लेखाचे भाववाचन शर्वाणी महाकाळ यांनी केले. ‘छावा’ या कादंबरीतील परिच्छेदाचे नाट्यवाचन डॉ. शशांक पाटील यांनी केले. उपकेंद्रातील योग शिक्षक अक्षय माळी यांनी महाराजांच्या रत्नागिरी जिल्ह्याशी असलेल्या संबंधाविषयी विचार व्यक्त केले. साहाय्यक प्राध्यापक अविनाश चव्हाण यांनी महाराजांनी लिहिलेल्या ‘बुधभूषण’ या ग्रंथाचे महत्त्व सांगत महाराजांविषयीची ऐतिहासिक तथ्ये मांडली.
संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या मराठा साम्राज्याच्या वीर पुरुषांनी परकीयांच्या आक्रमणांविरुद्ध लढा देऊन भारताचे अन्य प्रांत सुरक्षित ठेवण्याचे महान कार्य केले आहे. भारताचा दक्षिण भागही यामुळेच मोगलांच्या आक्रमणापासून सुरक्षित राहिला आणि तेथील कला अन् मंदिर संस्कृती इत्यादी सुरक्षित राहिली. याच वेळी त्यांनी शाहीर योगेश यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या कवितेचे वाचन केले आणि स्वत:च्या प्रेरक शब्दांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मधुरा पावसकर यांनी केले. सौ. सविता आंबर्डेकर यांनी आभार मानले.