गुहागर येथे १८ ते २२ मार्चला पर्यटन महोत्सव !

  • वाशिष्ठी नदीचे पूजन आणि नदीला विधीवत साडी नेसवणार

  • २२ मार्च जागतिक जलदिनाचे औचित्य 

  • खाडी पर्यटनातून होणार मगरींचे दर्शन

चिपळूण – वाशिष्ठी नदीच्या तीरावरील, गुहागर तालुक्यातील परचुरी येथील तरुण निसर्ग पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर यांनी २२ मार्च २०२४ या दिवशी ‘जागतिक जलदिनी’ सकाळी ८ ते १२ या वेळेत वाशिष्ठी नदीचे पूजन आणि नदीला विधीवत साडी नेसवण्याचा उपक्रम घोषित केला आहे. याच्या जोडीला परचुरीतील त्यांच्या आजोळ कृषी पर्यटन केंद्राच्या सुवर्णसुधा हाऊस बोटवर १८ ते २२ मार्च दरम्यान वाशिष्ठी पर्यटन महोत्सव साजरा होणार आहे. या हाऊसबोटीवर प्रतिदिन सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ३ ते ६ या वेळेत मराठीतील श्रीमद्भागवत आणि मत्स्यपुराण यांचे वाचन कार्यक्रम होणार आहे. खाडी पर्यटन, मगर दर्शन आदी कार्यक्रम पर्यटकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत.

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी या वेळी नर्मदेच्या तीरावर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. असाच प्रयोग गुहागर तालुक्यातील परचुरी येथे २२ मार्चला करण्यात येणार आहे.

कार्यक्रम स्थळ : ‘सुवर्णसुधा’ हाऊस बोट, आजोळ कृषी पर्यटन केंद्र, परचुरी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी. भ्रमणभाष ९४०४६५२२५२, ९२०९७०५१९४.
‘सुवर्णसुधा’ हाऊस बोट लोकेशन :
https://maps.app.goo.gl/23JxVvzbzuK2Sq8B9

‘वाशिष्ठी’ला साडी नेसवण्याचा उपक्रम ही नदीप्रति कृतज्ञता ! – धीरज वाटेकर, चिपळूण

धीरज वाटेकर

नदीचे मूल्य जाणणे आणि तिचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जगातील सर्व संस्कृती, सभ्यता नद्यांच्या काठावर निर्माण होऊन बहरल्यात. नद्या निरोगी राहिल्या, तरच मानवी आरोग्य निरोगी राहील. अस्वस्थ नद्या आपले जीवनही अस्वस्थ करत आहेत. शासनानेही ‘चला जाणूया नदीला’ लोकजागृती अभियान चालू ठेवले आहे. कोकणातील आणि उर्वरित महाराष्ट्रातील नद्या सारख्या नाहीत. राज्याच्या क्षेत्रफळाच्या १० टक्केही नसलेल्या कोकणात राज्यातील निम्मे पर्जन्यमान होऊनही सह्याद्री डोंगर रांगांतील सहस्रो खेडी उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ होतात.

‘कोकण रेल्वे’ प्रकल्पानंतर जणू दुष्परिणाम (साईडइफेक्ट) म्हणावा अशा वेगाने कोकणातील नद्या ‘ओव्हर’ल्यात. आज वाशिष्ठीसह अनेक नद्या पावसाळ्यात स्वत:चा काठ सोडून मानवी वस्तीत स्वत:चे दु:ख सांगण्यासाठी येत असतात. आम्ही नद्यांची भाषा समजून घ्यायला हवी आहे. तिची स्वच्छता ठेवायला हवी आहे. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे. ‘वाशिष्ठी’ला साडी नेसवण्याचा उपक्रम याचेच द्योतक ठरावा.