Illegal Orphanage Human Trafficking : बेंगळुरू (कर्नाटक) येथील मुसलमानांकडून चालवण्‍यात येणार्‍या अनधिकृत अनाथाश्रमात सापडल्‍या २० मुली !

  • राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाने घातली धाड !

  • आखाती देशांमध्‍ये मुलींची विवाहासाठी तस्‍करी होत असल्‍याचा संशय !

  • धाड घातल्‍यावर मशिदीतून मुसलमानांना बोलवण्‍यासाठी करण्‍यात आला भ्रमणभाष !

राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. प्रियंक कानुनगो

बेंगळुरू (कर्नाटक) – राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री. प्रियंक कानुनगो यांनी येथील एका अनधिकृत अनाथाश्रमात धाड घातली. त्‍यांना येथे २० मुली सापडल्‍या. त्‍यांची आखाती देशांमध्‍ये विवाहासाठी तस्‍करी केली जात असल्‍याचा संशय आहे. या संदर्भात श्री. कानुनगो यांनी ‘एक्‍स’वर या धाडीचा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे.

श्री. कानुनगो यांनी म्‍हटले की, या मुलींनी सांगितले की, अनाथालयाची देखरेख करणारी सलमा नावाची महिला कुवेतमध्‍ये मुलींचे विवाह जुळवते. जेव्‍हा मुलींना आयोगासमोर उपस्‍थित करण्‍यास सांगण्‍यात आले, तेव्‍हा सलमा आणि तिचा प्रमुख समीर यांनी गुंडांना बोलवले. या गुंडांनी भांडण करण्‍याचा प्रयत्न केला. पोलिसांच्‍या मध्‍यस्‍थीने गुंडांना आटोक्‍यात आणले असता, त्‍यांच्‍यापैकी एकाने दूरभाषवरून कुणाला तरी मशिदीतून जमावाला बोलवण्‍यास सांगितले. पोलिसांच्‍या सांगण्‍यावरून आणि आमच्‍या महिला अधिकार्‍यांच्‍या सुरक्षेची जाणीव ठेवून आम्‍ही पोलीस ठाण्‍यात गेलो. लांगूलचालनामुळे कर्नाटक सरकार गुन्‍हेगारांपुढे झुकत आहे. या अनाथाश्रमात अनाथांसह २० मुली होत्‍या. या मुलींना शाळेत पाठवले जात नाही. संपूर्ण बालगृहामध्‍ये एकही खिडकी किंवा नैसर्गिक प्रकाशव्‍यवस्‍था नाही. मुलींना पूर्णपणे बंदिस्‍त करून ठेवले जाते. येथे येण्‍यापूर्वी काही मुली शाळेत जात होत्‍या; मात्र त्‍यांचा अभ्‍यास बंद झाला आहे.

गेल्‍या वर्षीही बेंगळुरूतील एका अनाथालयावर धाड घातल्‍यावर आयोगाविरुद्धच करण्‍यात आला होता गुन्‍हा नोंद !

विशेष म्‍हणजे २३ नोव्‍हेंबर २०२३ या दिवशी कर्नाटक सरकारने प्रियंक कानुनगो यांच्‍याविरुद्ध वॉरंट प्रसारित केले होते. बेंगळुरूमधील एका अनाथाश्रमाला भेट देतांना प्रियंक कानुनगो यांनी तेथील मुलांची स्‍थिती पाहिली आणि त्‍याची तुलना तालिबानी जीवनाशी केली होती. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या कर्नाटक सरकारने तक्रारीवरून हे पाऊल उचलले होते.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्‍या राज्‍यात याहून वेगळे काय घडणार ? राष्‍ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोगाला जी माहिती मिळते ती राज्‍यातील पोलिसांना का मिळत नाही ? कि माहिती मिळूनही अनाथालय मुसलमानांकडून चालवण्‍यात येत असल्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले जात होते ?