ISIS : ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांकडून दरोडा घालून बाँबचे साहित्य खरेदी केल्याचे ‘ए.टी.एस्.’च्या अन्वेषणात उघड !

पुणे – ‘इस्लामिक स्टेट’च्या ३ आतंकवाद्यांनी सातारा येथील वस्त्रदालनावर ८ एप्रिल २०२३ या दिवशी दरोडा घालून १ लाख रुपयांची रोकड लुटली होती. या प्रकरणी व्यापार्‍याने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आतंकवाद्यांनी दरोडा टाकल्यावर लुटीतून मिळालेले पैसे आतंकवादी कारवायांसाठी, बाँबचे साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याचे आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) केलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्यांनी बाँब सिद्ध करण्याचे साहित्य कुठून खरेदी केले, तसेच लुटमारीसाठी पिस्तूल कुठून आणले, या दृष्टीने अन्वेषण करायचे आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. या अन्वेषणासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी अधिवक्ता विजय फरगडे यांनी केली. विशेष न्यायालयाने तिघांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ए.टी.एस्.ने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या शहानवाज खान, महंमद युनूस महंमद याकू आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरतांना तिघांना पकडले होते. तिघे जण आतंकवादी कारवायात सहभागी असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले होते. पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात आले होते. ए.टी.एस्.ने अन्वेषणासाठी शहानवाज, महंमद, झुल्फीकार यांना कह्यात घेतले. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायालयात उपस्थित केले होते.