CAA Pakistani Reaction : पाकची सीमा उघडली, तर सगळे हिंदू भारतात जातील !

भारतातात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू झाल्यावर पाकिस्तान्यांच्या प्रतिक्रिया !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुसलमानबहुल देशांतून आलेल्या आणि वर्ष २०१४ च्या पूर्वीपासून भारतात रहाणार्‍या मुसलमानेतरांना नागरिकत्व मिळू शकणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे केवळ भारतात रहाणारे पाकिस्तानी निर्वासितच नव्हे, तर पाकिस्तानात रहाणारे मुसलमानही कौतुक करत आहेत. पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध ‘यू ट्यूबर’ (यू ट्यूब चॅनल चालवणारा) सोहेब चौधरी यांनी पाकमधील नागरिकांची ‘सीसीए’विषयीचे मत जाणून घेतले. त्यावर बहुतेकांनी पाकमधील हिंदूंना सीमा उघडून दिली, तर ते सर्व जण भारतात जातील, असे तेथील लोकांनी म्हटले.

सौजन्य : Real entertainment tv

१. आमचे मुसलमान बंधूत्व (मुस्लिम ब्रदरहूड) खोटे आहे !

सोहेब चौधरी यांच्याशी संवाद साधतांना एका पाकिस्तानी तरुणाने सांगितले की, आम्ही पाकिस्तानचे लोक ‘मुस्लिम ब्रदरहूड’ (मुसलमान बंधूत्व) याबद्दल बोलतो; पण आमचे बंधूत्व खोटे आहे. अफगाणिस्तानातील निर्वासित मुसलमान ४० वर्षांपासून पाकिस्तानात रहात आहेत; परंतु आजपर्यंत आम्ही त्यांना नागरिकत्व दिलेले नाही. उलट त्यांना हुसकावून लावत आहोत. त्याच वेळी, इतर देशांमध्ये अडचणींचा सामना करणार्‍या हिंदु बांधवांना मात्र भारत स्वतःच्या देशाचे नागरिकत्व देऊ करत आहे. एवढेच नाही, तर यात शिखांचाही समावेश केला आहे. मोदी हे खरे नेते आहेत. ‘हे लोक नागरिक बनून देशाच्या प्रगतीला हातभार लावतील’, हे त्यांना ठाऊक आहे.

२. पाकने सीमा उघडल्या, तर हिंदु भारतात जातीलच; मात्र काश्मीरमधील एकही मुसलमान पाकिस्तानात येणार नाही !

अन्य एक पाकिस्तानी तरुण म्हणाला की, कृपया या लोकांना सांगा की, पाकिस्तानात रहाणारे हिंदु भारतात जाण्याचे कारण काय आहे ? गेल्या ४० वर्षांत किती नवीन मंदिरे बांधली ?, याचे उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तानात रहाणार्‍या हिंदूंच्या मूलभूत गरजांची काळजी का घेतली जात नाही ? आज परिस्थिती अशी आहे की, जर सीमा उघडण्यात आल्या, तर पाकिस्तानात रहाणारे सर्व हिंदु भारतात जातील. याउलट भारताचा भाग सोडा, काश्मीरमधूनही मुसलमान पाकिस्तानात येणार नाहीत.

३. पाकिस्तानचे शेजारी देशांसमवेतचे संबंध अजिबात चांगले नाहीत !

पाकिस्तानचे शेजारी देशांसमवेतचे संबंध अजिबात चांगले नाहीत, असे पाकिस्तानी तरुणांनी सांगितले. ते म्हणाले की, तुम्ही इराणकडे बघा, अफगाणिस्तानकडे बघा, पाकिस्तानचे कुणाशीही चांगले संबंध नाहीत. भारताकडे पहा, इराणशी त्याचे संबंध इतके चांगले आहेत की, भारत तेथे चाबहार बंदर बांधत आहे. भारताचे बांगलादेशाशी असलेल्या संबंधांवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. अफगाणिस्तानचे तालिबान सरकारही पाकिस्तानशी नाही, तर भारताशी संबंध सुधारण्यात गुंतले आहे.

संपादकीय भूमिका

पाकमधील मुसलमानांच्या जे लक्षात येते, ते भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी जन्महिंदु राजकारण्यांना लक्षात येत नाही. आता अशा हिंदूंनाच कुणी पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !