अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – कुरनूर धरणातून अक्कलकोट शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने सहस्रो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या पाणीटंचाईची भीषणता पहाता अक्कलकोटवासियांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरी पाऊस न झाल्याने कुरनूर धरण जेमतेम ३० ते ३५ टक्के भरले होते. या कुरनूर धरणावर अनेक गावे, तसेच अक्कलकोट-मैंदर्गी-दुधनी या नगर परिषदांच्या पाण्याच्या योजना चालू आहेत. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात पाणी साठा झाला नाही. सध्या धरण कोरडे पडले असून मृतसाठ्याच्या पाण्यातून अक्कलकोटकरांची तहान भागवण्यात येत आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला १० ते १२ ठिकाणी गळती लागली असून यामुळे सहस्रो लिटर पाणी व्यय होत आहे. (पाण्याची इतकी टंचाई असतांना या गळतीकडे प्रशासन त्वरित लक्ष का देत नाही ? यासाठी उत्तरदायी कर्मचार्यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक. – संपादक) पाण्याअभावी आबालवृद्धांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ‘नगर परिषद प्रशासन, तसेच मुख्याधिकारी यांनी जलवाहिनीची गळती थांबवून पाण्याची होणारी नासाडी बंद करावी’, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.