महिला सशक्तीकरणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

साखळी येथील नारी शक्ती वंदन संमेलन

पणजी, ६ मार्च (वार्ता.) : समान नागरी कायदा हा कोणताही धर्म किंवा जात यांवर आधारित नाही. जन्म, लग्न आणि मृत्यू यांची नोंदणी करणे, तसेच नवर्‍याबरोबर पत्नीलाही मालमत्तेवर समान अधिकार देणे, हे समान नागरी कायद्याचे वैशिष्ट्य आहे. महिला सशक्तीकरण आणि लिंगभेद दूर करणे, यांसाठी हा कायदा सर्व राज्यांमध्ये लागू झाला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करतांना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,

‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे त्यांच्या भाषणात गोव्याचे सुपुत्र आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाविषयी गौरवोद्गार काढले. केंद्राने काश्मीर येथून कलम ३७० हटवल्यानंतर भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र आणि अखंड बनला आहे. यासंबंधीची एकंदर पार्श्वभूमी ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात मांडण्यात आली आहे.