सिंधुदुर्ग : सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार एका रात्रीत पूर्ण !

ग्रामस्थ आणि भाविक यांचा संकल्प अखेर पूर्णत्वास !

श्री देव सपतनाथ देवाचे जिर्णाेद्धारापूर्वीचे मंदिर

सावंतवाडी : सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार करण्याची गेल्या कित्येक वर्षांची ग्रामस्थांची इच्छा ६ मार्च या दिवशी पहाटे पूर्ण झाली. श्री सातेरी आणि श्री भगवती देवतांनी दिलेला कौल अन् श्री सपतनाथदेवाचा आशीर्वाद घेऊन ५ मार्च या दिवशी सूर्यास्तानंतर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या सेवेला प्रारंभ करण्यात आला आणि ६ मार्च या दिवशी पहाटे कलशारोहण करून या सोहळ्याची सांगता झाली. हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पहाण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

५ मार्चला रात्री मंदिर बांधकामाची सेवा करतांना ग्रामस्थ

सरमळे-दाणोली मार्गावर हे अपूर्ण अवस्थेत असलेले मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा जीर्णाेद्धार करावा, अशी येथील ग्रामस्थ आणि भाविक यांची कित्येक वर्षांची इच्छा होती. अखेरीस देवतांच्या आशीर्वादाने मंदिर जीर्णाेद्धाराचा संकल्प करून ग्रामस्थांनी तो पूर्णत्वास नेला.

देवतांच्या आशीर्वादाने मंदिर जीर्णाेद्धाराचा संकल्प करून ग्रामस्थांनी तो पूर्णत्वास नेला !
पूर्णत्वास आलेले नूतन श्री देव सपतनाथ मंदिर !

मंदिराचा जीर्णाेद्धार झाल्यानंतर ६ मार्चला मंदिर सुशोभीकरणाची सेवा करण्यात आली. ७ मार्चला मंदिरात देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि अन्य धार्मिक विधी होणार आहेत. ८ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद आणि सायंकाळी भजन स्पर्धा होणार आहे.