महाराष्ट्र विधीमंडळाचे पुढील अधिवेशन १० जूनला मुंबई येथे !

मुंबई – विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चला राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन १० जून २०२४ या दिवशी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेत २७ घंटे ३२ मिनिटे कामकाज झाले. प्रतिदिनचे सरासरी कामकाज ५ घंटे ३० मिनिटे झाले आहे. अधिवेशनात सभागृहात सदस्यांची उपस्थिती ९६.३६ टक्के होती, तर एकूण उपस्थिती ७७.८२ टक्के एवढी होती.

विधान परिषदेत १ विधेयक पुन:र्स्थापित करण्यात आले आणि ते संमत करण्यात आले. विधानसभेने संमत केलेली ६ विधेयके विधान परिषदेत संमत करण्यात आली, तर २ विधेयके शिफारशींविना विधानसभेकडे परत पाठवण्यात आली.

विधानसभेत प्रत्यक्षात २८ घंटे ३२ मिनिटे कामकाज !

विधानसभेत २८ घंटे ३२ मिनिटे कामकाज झाले. प्रतिदिनचे सरासरी कामकाज ५ घंटे ४२ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची उपस्थिती ९१.४४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७३.१५  टक्के एवढी होती. विधानसभेत पुन:र्स्थापित ९ शासकीय विधेयके मांडण्यात आली असून सर्व विधेयके संमत झाली. विधान परिषदेने संमत केलेले १ विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना २ असून दोन्ही सूचना मान्य करण्यात आल्या.