विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून सरकारचा निषेध !

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या १ मार्च या दिवशी कामकाज चालू होण्यापूर्वीच विधीमंडळ परिसरात विरोधक आक्रमक झाले. ‘अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकर्‍यांसाठी निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल’ अशा घोषणा देऊन सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधी सदस्यांनी निदर्शने केली.