सातारा, २९ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरासह सीमावाढ भागातील भरीव विकास कामांचा समावेश असलेला अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी या दिवशी सातारा नगरपरिषदेच्या प्रशासकीय सभेत संमत करण्यात आला. सातारा परिषदेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली लेखा विभागाचे लिपिक भालचंद्र डोंबे अर्थसंकल्पाचे वाचन केले.
या वेळी मुख्याधिकारी बापट म्हणाले, ‘‘नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियमातील प्रावधानांनुसार सीमावाद भागाला पहिल्या वर्षासाठी एकूण मालमत्ता कराच्या २० टक्के, तर दुसर्या वर्षासाठी ४० टक्क्यांप्रमाणे कर मागणी देयके देण्यात आली आहेत. सीमावाद भागातील अनुमाने ५० टक्के नागरिकांनी कर भरणा केला आहे. या वर्षीही पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणार्या मिळकतधारकांना घरपट्टीमध्ये सवलत दिली जाईल. नगरपरिषदेने नुकतेच स्वतःचे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. नागरिकांना मालमत्तांचे स्वयं मूल्यांकन करणे, कर भरणे, करविषयक सेवा, तक्रारी, अभिप्राय अशा सेवा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. पालिकेने प्रशासकीय इमारत, उड्डाणपूल सुशोभीकरण (पोवई नाका) शिवतीर्थ, सुशोभीकरण इत्यादी कामे हाती घेतली आहेत. तसेच किल्ले अजिंक्यतारा रस्ता सुधारणा, हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मारक अशी कामे पूर्णत्वास आली आहेत. अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात येणार आहे.’’