विरार (पालघर) – येथील प्रसिद्ध श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. २६ फेब्रुवारी या दिवशी बोईसरजवळील नागझरी येथे हा सोहळा पार पडला. ऋण काढून केला जाणारा विवाहातील भरमसाठ व्यय टाळून विवाहितांना ऋणातून मुक्त ठेवणे, हा यामागील उद्देश होता. या आयोजनात ‘जय आदिवासी युवा शक्ती’ आणि ‘सर्वदा प्रतिष्ठान’ यांचे सहकार्य लाभले.
या विवाहातील संपूर्ण व्यय श्री जीवदानीदेवी संस्थानने उचलला होता. संस्थानच्या वतीने प्रत्येक वधूला एक ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी वस्तू, तसेच वधू-वरांना पेहराव देण्यात आले. पुरोहितांनी हिंदु प्रथेप्रमाणे लग्नाचे विधी केले. भोजनव्यवस्था सद्गुरु श्री नरेंद्र महाराज संस्थानने केली. या वेळी लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरही यांसह १५ सहस्र लोक उपस्थित होते.
या वेळी श्री जीवदानीदेवी संस्थानच्या वतीने प्रत्येक वधू-वरांना सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादनांचा संच भेट देण्यात आला.