Stop Namaz Over Gyanvapi : ज्ञानवापीच्या व्यास तळघराच्या वर मुसलमानांच्या नमाजपठणास बंदी घालावी !

हिंदु पक्षाची जिल्हा न्यायालयात याचिका

वाराणसी (उत्तरप्रदेश) –  ज्ञानवापीमध्ये असलेल्या व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अनुमती मिळाल्यानंतर आता हिंदु पक्षाकडून या तळाघराच्या वर मुसलमानांना चालण्या-फिरण्यास आणि नमाजपठणास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

तसेच तळघरातील छत आणि खांब यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर १९ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे.

हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जानेवारीपासून व्यास तळघरात पूजा चालू झाली आहे. व्यास तळघराचे छत अतिशय जुने आणि कमकुवत आहे. तळघराच्या छतावर मुसलमान चालतात. एखाद्याने धार्मिक स्थळाच्या छतावर चालणे किंवा नमाजपठण करणे योग्य नाही. तळघराचे छत आणि खांब बर्‍यापैकी कमकुवत आहेत. काही कारणाने ते पडतील, असे होऊ नये. त्यामुळे मुसलमान समाजातील लोकांना तळघराच्या छतावरून चालणे बंद करावे, तसेच तळघराचे छत आणि खांब दुरुस्त करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.’’