इंग्लंडच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधात इस्लामद्वेषाचा दावा !

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केला पक्षाचा बचाव !

पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन – इस्लामद्वेषासंदर्भात खासदार ली अँडरसन आणि सुएला ब्रेव्हरमन यांच्या टिप्पण्यांनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांना आता त्यांच्या पक्षाच्या बचावासाठी पुढे यावे लागले आहे. कंझर्व्हेटिव्ह (पुराणमतवादी) पक्षात ‘इस्लामोफोबिक (इस्लामद्वेषी) प्रवृत्ती’ आहे का, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता ते ‘नाही, नाही’ असे म्हणाले. ऋषी सुनक म्हणाले की, हा वाद हानीकारक आहे. अशा प्रकारे इतरांना भडकावू नये.

खासदार ली अँडरसन यांनी लंडनचे मुसलमान महापौर सादिक खान यांच्यावर केले होते वक्तव्य !

लंडनचे सध्याचे महापौर सादिक खान चर्चेत आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार ली अँडरसन यांनी खान यांच्यावर टिप्पणी केली होती. खान इस्लामी आतंकवाद्यांच्या कह्यात असल्याचे त्यांनी म्हटले होते. खान यांनी लंडनला आतंकवाद्यांच्या स्वाधीन केल्याचेही ली यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली. नंतर त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले. गाझामधील युद्धविरामाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात लंडनमध्ये अनेक मोर्चे काढण्यात आले. तेव्हा ली अँडरसन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

खासदार सुएला ब्रेव्हरमन यांनीही इस्लामी आतंकवाद्यांवर केली कठोर टीका !

ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही नुकतीच इस्लामी आतंकवाद्यांवर कठोर टिप्पणी केली. त्या म्हणाल्या, ‘ब्रिटन आता आपली ओळख गमावत आहे. विविध धर्म आणि वंश यांचे शांततेने सहअस्तित्व ही ब्रिटनची ओळख आहे; पण आता ब्रिटन इस्लामवादी झाले आहे. आतंकवाद्यांनी त्याला कह्यात घेतले आहे. मी इस्लामी तुष्टीकरणाच्या विरोधात बोलले होते. त्यामुळे मला मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आले. ब्रिटन आता असा समाज बनला आहे, जिथे अभिव्यक्ती आणि ब्रिटीश मूल्ये कमकुवत झाली आहेत. ब्रिटनला आता इस्लामवादी, आतंकवादी आणि ज्यूविरोधी लोकांनी कह्यात घेतले आहे !’ ब्रेव्हरमन यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.

पंतप्रधान सुनक यांच्याकडून स्पष्टीकरण !

लंडनचे महापौर सादिक खान यांनी ली अँडरसन यांच्या या विधानांना इस्लाम आणि वर्ण द्वेषी म्हटले होते. तेव्हापासून पंतप्रधान सुनक यांच्यावर या प्रकरणी थेट प्रतिक्रिया देण्याविषयी दबाव होता. यासंदर्भात सुनक यांनी सांगितले की, ली अँडरसन यांची टिप्पणी चुकीची आहे आणि त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शब्द महत्त्वाचे आहेत. विशेषत: सध्याच्या वातावरणात जेथे तणाव वाढत आहे, तेथे आपले शब्द काळजीपूर्वक निवडणे, हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे.