सातारा – महाराष्ट्राला कला आणि संस्कृती यांचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृती यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यामध्ये ७५ नाट्यगृहे अद्ययावत् करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधांनी संपन्न असावी आणि परिपूर्ण असावीत, यासाठी ११ तज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे १०० वे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वर येथे संपन्न झाले. या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली आहे. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप अनेक पालट रंगभूमीने स्वीकारले आहेत. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. नाट्यसंमेलनांमधून नवीन कलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. गौरवशाली नाट्य संस्कृतीचा विस्तार दिग्गज कलाकार करत आहेत. कलेला जेव्हा रसिक दाद देतात, तेव्हाच कलाकार कला समृद्ध करू शकतो. त्यामुळेच राज्यशासनाने ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे. महाबळेश्वर येथे २ सहस्र प्रेक्षक क्षमतेचे बंद असलेले नाट्यगृह पुन्हा चालू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.’’