सुवचनांच्या माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन करणार्या प.पू. कलावतीआई आणि प.पू. आईंची सुवचने सोप्या भाषेत मांडणारे पू. किरण फाटक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘प.पू. कलावतीआई यांची साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणारी सुवचने ही अतिशय सोपी आणि साधनेची विविध अंगे उलगडणारी आहेत. प.पू. आईंची वाणी चैतन्यमय आणि मधुर असल्याने त्यांच्या सुवचनांचे आकलन लवकर होते अन् त्या सुवचनांप्रमाणे कृती करण्यास साधक प्रवृत्त होतो. पू. किरण फाटक यांनी आतापर्यंतच्या २३ लेखांमधून प.पू. कलावतीआई यांच्या सुवचनांवर साध्या-सोप्या भाषेत विवेचन केले आहे. त्यांनी अनेक सोपी उदाहरणे आणि संतांचे अभंग यांच्या माध्यमातून विषय आणखी सोपा करून मांडला आहे. त्यामुळे साधनेविषयीच्या एकेका अंगाचे ज्ञान होण्यास आणि त्याप्रमाणे कृती करण्यास प्रवृत्त होण्यास साधकांना साहाय्य होत आहे. आज या लेखमालिकेतील शेवटचे पुष्प आम्ही श्री गुरुचरणी अर्पण करत आहोत. साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही सर्व साधक प.पू. कलावतीआई आणि पू. किरण फाटक यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – संकलक |
१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘जाई, जुई, मोगरा, चाफा इत्यादी सुवासिक फुलांच्या कळीमध्ये गुप्तपणे वास (सुगंध) असतो. कळी फुलली की, तो सुवास चहूकडे दरवळतो. तेणेकरून वातावरण अल्हाददायक होते. तद्वत् प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी गुप्तपणे ब्रह्मानंदाचा निवास असतो. सद्गुरुकृपेने साधकाचे हृदयकमळ फुलल्यावर, म्हणजे त्याचे चित्त शुद्ध झाल्यावर तो ब्रह्मानंद प्रगट होतो. त्यावर त्या व्यक्तीच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे हृदय आनंदाने भरून जाते, म्हणजे त्यांना संसारदुःखाचा विसर पडतो.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘ब्रह्मानंद’, सुवचन क्रमांक ७)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
२ अ. माणसाने ‘माझ्यातही ईश्वरी अंश आहे’, असे आपल्या मनाला सांगावे ! : ‘चराचरात ईश्वरी शक्तीचे वास्तव्य असते’, असे सर्व संत सांगतात; म्हणून द्वैतभाव विसरून माणसाने अद्वैताकडे वाटचाल केली पाहिजे, म्हणजे काय ? तर ‘माझ्यातही ईश्वरी अंश भरलेला आहे’, असे मनाला ठामपणे समजवावे. असे जर आपण मनाला समजावले, तर आपल्या मनातील सर्व वाईट भावना आपोआप लयाला जातील आणि आपल्या हृदयात चांगल्या अन् सकारात्मक विचारांचा उगम होऊ लागेल. आपली बुद्धी त्याप्रमाणे काम करू लागेल.
२ आ. सद्गुरुकृपेने माणसाच्या हृदयाचे कमळ उमलल्यानंतर त्याच्या सद्वर्तनाच्या सुगंधाने तो स्वतःसह दुसर्यालाही आनंदी करू लागतो ! : प्रत्येक फुलात सुगंध आणि सौंदर्य भरलेले असते; परंतु फूल पूर्ण उमलल्यावर तो सुगंध आसमंतात पसरतो अन् आसमंत सुगंधी, आनंददायी आणि उत्साहवर्धक करून टाकतो. ‘माणसाच्या हृदयाचे कमळ सद्गुरुकृपेने उमलले की, माणसाच्या सद्वर्तनाचा सुगंध समाजात पसरू लागतो आणि तो माणूस स्वतः आनंदी होऊन दुसर्यांनाही आनंदी करू लागतो’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
२ इ. हृदयकमळ फुलण्यासाठी सद्गुरूंचे आज्ञापालन करून इंद्रियांवर बुद्धीने नियंत्रण ठेवावे लागते ! : हे हृदयकमळ फुलण्यासाठी सद्गुरु सांगतील, त्याप्रमाणे साधना करावी लागते आणि गुरुमंत्राचा जप करावा लागतो. आपले वर्तन अत्यंत पवित्र ठेवावे लागते. आपल्या तोंडावर ताबा ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या विषयसुख घेणार्या इतर सर्व इंद्रियांवरसुद्धा बुद्धीने नियंत्रण ठेवावे लागते.
२ ई. सद्गुरुकृपा झालेल्या संतांच्या सहवासात आलेले लोक आनंदी होतात आणि त्यांच्या वागण्यात सकारात्मक पालट होतात ! : ज्याप्रमाणे सुंदर आणि सुगंधी फूल फुलल्यावर त्याचा सुगंध अन् सौंदर्य पूर्ण आसमंतात पसरतात आणि संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो, त्याप्रमाणे जे लोक सद्गुरुकृपा झालेल्या व्यक्तीच्या सहवासात येतात, तेसुद्धा आनंदी होतात. त्यांच्याही मनात सकारात्मक विचार चालू होतात आणि त्यांची वागणूकही बदलू लागते. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात सकारात्मक बदल झालेले दिसतात; म्हणून ‘संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
संतांवर सद्गुरुकृपा झालेली असते. ते संसारदुःखापासून दूर गेलेले असतात. त्यांच्या सान्निध्यात येणार्या माणसांनासुद्धा ते त्याचा लाभ करून देतात. संत हे कधीही द्वेष, दुस्वास आणि क्रोध करत नाहीत. त्यांच्यामध्ये लोभ आणि मोह नसतो. ते सर्व या विषयांपासून ‘कोसो मैल (कित्येक कोस)’ दूर गेलेले असतात. त्यामुळे त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, दिसणे आणि पहाणे हे अत्यंत पवित्र अन् शांत, असे असते. अशा संतांच्या सहवासात आल्यावर इतर माणसेही शांत होत जातात आणि तात्पुरती का होईना, स्वत:ची सर्व संसारदुःखे विसरतात, तसेच संतांच्या शिकवणीप्रमाणे हळूहळू वर्तन करू लागतात अन् आपल्याला त्यांच्या स्वभावात चांगला बदल बघावयास मिळतो.
२ उ. संतांचा महिमा !
२ उ १. संतांच्या सहवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याविना त्यांचा महिमा कळत नाही !
संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकाचे काम नाही येथे ।। १ ।।
बहुदुधड जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ।। २ ।।
तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण । तरीच महिमान येईल कळो ।। ३ ।।
अर्थ : संतांच्या सहवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या माणसाला त्यांचा महिमा केवळ शब्दांनी समजून घेता येत नाही. जरी गाय आणि म्हैस भरपूर दूध देणारी असली, तरी त्यांना कामधेनूची सर कधीच येणार नाही; कारण कामधेनु, म्हणजे आपल्या मनात ज्या ज्या इच्छा येतात, त्या पूर्ण करणारी अलौकिक गाय ! तिची सर कुठल्याच अन्य गायीला अथवा म्हशीला येणार नाही; म्हणून ‘प्रत्यक्ष अनुभव घेतल्याविना संतांचा महिमा कळून येत नाही’, असे संत तुकाराम महाराज सांगतात.
२ उ २. संत आणि देव हे एकच असतात !
संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात,
संतांचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांसी पुसणें ।। १ ।।
ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ।। २ ।।
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ।। ३ ।।
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ।। ४ ।।
मागें पुढें न हो कोणी । शरण एका जनार्दनीं ।। ५ ।।
– संत एकनाथ अभंग गाथा, अभंग १४९१
अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘संतांचा महिमा देवच जाणू शकतो आणि देवाचा पत्ता संतच सांगू शकतात. असे एकमेकांना जाणणारे देव आणि संत हे वेगळे नसतातच. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कोणताही रंग मिसळला की, ते पाणी त्या रंगाचे दिसते, त्याप्रमाणे संत आणि देव हे एकच असतात. देवालाही संतांविना क्षणभरही करमत नाही. दोघांनाही एकमेकांची गोडी असते. संत आणि देव या दोघांमध्ये कुणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. तुम्ही यांपैकी कुणालाही एकाला शरण जा.
(अंतिमतः ईश्वरी तत्त्व एकच आहे.)’
म्हणून संतांकडे गेल्यावर त्यांच्या सान्निध्यात येणार्या लोकांमध्येसुद्धा हळूहळू देवत्व प्राप्त होत जाते. ते अत्यंत शांत, गंभीर आणि मितभाषी होतात.
२ उ ३. संतांच्या केवळ दर्शनाने पातकी लोकांचा उद्धार होतो !
उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य ।। १ ।।
काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करिती जगी ।। २ ।।
अधम आणि पापराशी । दरुशनें त्यांसी उद्धार ।। ३ ।।
लागत त्यांच्या चरण कमळीं । पाप तापा होय होळी ।। ४ ।।
एका जनार्दनीं भेटतां । हरे संसाराची चिंता ।। ५ ।।
अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘संत हे अतिशय उदार आणि मोठ्या अंतःकरणाचे असतात. त्यांच्यामध्ये एक अलौकिक अशी वैश्विक शक्ती वास करत असते. त्यांचा महिमा काय वर्णावा ? ते पापी लोकांना पावन करतात. त्यांच्या नुसत्या दर्शनानेही अधम आणि पातकी लोक उद्धरून जातात. संतांना शरण गेल्याने पापकर्मे आणि सांसारिक दुःखे यांचा नाश होतो. संतांची कृपा झाली की, संसाराची चिंता दूर होते.’
म्हणून ‘आपण नेहमी संतचरणी लीन असावे. आपण त्यांच्यामधील गुणांचा स्वीकार करावा’, असे प.पू. कलावतीआई आपल्याला सांगतात.
२ उ ४. संतांच्या सहवासात आल्यावर माणसाला ब्रह्मानंदाची जाणीव होऊन हळूहळू त्याचीही संतपदाकडे वाटचाल होते ! : प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ब्रह्मानंद लपलेला असतो; परंतु मायेच्या आणि संसारातील सुख-दुःखांच्या आवरणाखाली तो पार झाकून गेलेला असतो. माणसाला त्याची काहीच कल्पना नसते; परंतु संतांच्या सहवासात आल्यावर या ब्रह्मानंदाची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागते; कारण संतांच्या सहवासात आल्यावर त्याची संसारदुःखे हळूहळू कमी होत जातात. पाप आणि ताप यांचे ब्रह्मानंदावर आलेले आवरण दूर होते अन् माणसाला एक प्रकारची समाधी अवस्था प्राप्त होते. तोही हळूहळू संतपदाकडे वाटचाल करू लागतो.
२ उ ५. प्रत्येक माणसाला सद्गुरुकृपेने देवत्व प्राप्त होऊ शकते ! : ‘सद्गुरुकृपेने, म्हणजेच संतांच्या कृपेने जेव्हा माणसाचे हृदय उमलून येते, तेव्हा त्या ब्रह्मानंदाने माणूस अतिशय शांत होतो आणि तो अध्यात्माच्या वाटेवरून मार्गस्थ होतो’, असे प.पू. कलावतीआई वरील वचनामध्ये सांगतात. त्यांच्या वचनामध्ये आपण जर खोलवर डोकावून बघितले, तर आपल्याला असे आढळून येते की, प्रत्येक माणूस हा संत बनण्याच्या पात्रतेचा असतो. प्रत्येक माणसाला सद्गुरुकृपेने देवत्व प्राप्त होऊ शकते; परंतु तसा योग आयुष्यात यावा लागतो आणि तशी बुद्धी माणसाला व्हावी लागते, म्हणजे तो सद्गुरूंकडे आपोआप ओढला जातो, किंबहुना त्याच्या साधनेने प्रसन्न होऊन सद्गुरुच त्याला शोधत येतात आणि त्याचा उद्धार करतात.’
– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२.१०.२०२३)
(समाप्त)