पाकमधील नियमित पूजा होत असलेल्या एकमेव मंदिराच्या शेजारी उभारले जात आहे नवे मंदिर !

  • सिंध प्रांतात उभारले जात आहे हे राममंदिर !

  • बाबर आणि झुल्फिकार करत आहेत बांधकाम !

कराची (पाकिस्तान) – अयोध्येतील श्रीराममंदिर, तसेच अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिर यांच्या उभारणीनंतर आता मुसलमानबहुल पाकिस्तानात उभारण्यात येणार्‍या नव्या राममंदिराची चर्चा चालू झाली आहे. तसे मूळचे २०० वर्षे जुने राममंदिर येथे आहे; परंतु त्याची दुरवस्था झाल्याने नवे मंदिर त्याच्याशेजारीच उभारले जात आहे. सिंध प्रांतात असलेल्या थारपारकर जिल्ह्यातील इस्लामकोट येथील हे २०० वर्षे जुने मंदिर तसे मोठे नसले, तरी स्थानिक हिंदूंच्या मते हे पाकमधील एकमेव मंदिर आहे, जिथे पूजा केली जाते. त्यामुळे अल्पसंख्य हिंदूंमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. सिंध प्रांतातील डेरा रहीम यार खान येथील रहिवासी माखन राम जयपाल यांनी याविषयी एका व्हिडिओ प्रसारित करून या मंदिराची माहिती दिली.

सौजन्य Makhan Ram jaipal Vlogs

१. माखन यांनी सांगितले की, मंदिर बांधण्यात गुंतलेल्या कारागिरांच्या व्यतिरिक्त मजूरसुद्धा मुसलमान आहेत. येत्या ६ महिन्यांत मंदिराची नवीन इमारत बांधली जाईल, अशी आशा असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यानंतर जुन्या मंदिरातील मूर्ती नव्या मंदिरात विराजित केल्या जातील. या वेळी त्यांची धार्मिक विधींसहित प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. मूळ मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींखेरीज भगवान शिवाची मूर्तीही स्थापित आहे.

२. मंदिर बांधणार्‍या बाबराने सांगितले की, पाकिस्तानात स्वातंत्र्यापूर्वी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यांतील बहुतांश मंदिरांच्या देखभाल दुरुस्तीच्या अभावी दुरवस्था झाली आहे. बाबरसह झुल्फिकार हे दोघे मुसलमान तरुण मंदिराची नवीन इमारत बांधणार आहेत.

संपादकीय भूमिका 

ज्या बाबराने अयोध्येतील श्रीराममंदिर पाडले, त्याच्याच नावाचा कारागीर पाकमध्ये मंदिर बांधत आहे. या ‘बाबरा’त जरी तशी जिहादी वृत्ती नसली, तरी ‘बाबरा’ची विद्ध्वंसक हिंदुद्वेषी वृत्ती असलेले पाकमधील त्याचे वंशज या मंदिराला हानी पोचवणार नाहीत, हे कशावरून ?