|
पणजी : सासष्टीतील नेसाई (सां जुझे दि आरियल) येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विमोचन करायला गेलेले समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर करण्यात आलेल्या पूर्वनियोजित आक्रमणाचे धागेदोरे थेट सांखवाळ येथील उद्ध्वस्त झालेल्या प्राचीन श्री विजयादुर्गादेवीच्या मूळस्थानाच्या म्हणजेच फ्रंटीस पीस वारसास्थळाच्या प्रकरणाशी जोडलेले आहेत, हे आता उघडकीस येऊ लागले आहे, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
पुरातत्व खात्याकडून वादग्रस्त फ्रंटीस पीस वारसास्थळाची अधिकृत संयुक्त पहाणी २७ डिसेंबर २०२३ या दिवशी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी संरक्षित वारसास्थळात होणारा चर्चचा हस्तक्षेप आणि अतिक्रमण यांविषयी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार गेल्या ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सरकारच्या पुरातत्व खात्याने केलेली ही पहिली अधिकृत पहाणी होय. आतापर्यंत पुरातत्व खाते सांभाळणार्या मंत्र्यांच्या कारकिर्दीत गेल्या ११ वर्षांत चर्चची सगळी बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जात होती. त्यासह शेकडो वर्षांपासून शिंदोळी गावात भरत आलेले ‘सेंट जोसेफ व्हाझ फेस्त’ आणि ‘अवर लेडी ऑफ हेल्थ फेस्त’ वर्ष २०१८ मध्ये फ्रंटीस पीस येथे स्थलांतरित करणे अन् पायी तीर्थयात्रा (वॉकिंग पिलिग्रीमेज) ही ख्रिस्ती भाविकांची फ्रंटीस पीस येथील पदयात्रा वर्ष २०१९ पासून तत्कालीन पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांच्या सहकार्यानेच करण्यात चालू आली होती, हे विशेष !
पुरातत्व खात्याने केलेल्या पहाणीचा अहवाल स्पष्ट आहे. चर्चने वारसास्थळात केलेले बेकायदेशीर बांधकाम आणि एकंदर अतिक्रमण यांची माहिती या अहवालात उघड झाली आहे. ही बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटवावीत, अशी नोटीसही चर्चसंस्थेला पाठवण्यात आलेली आहे.
हे ही वाचा – गोवा : (म्हणे) ‘बाहेरून येऊन तणाव निर्माण करणार्यांवर गुन्हे नोंद करा !’ – स्थानिक ग्रामस्थांची मागणी
वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप चर्चसंस्थेने गोवाभर प्रवचनांद्वारे पसरवला आहे. त्यामुळे शिवपुतळ्याचे उद्घाटन करायला मंत्री फळदेसाई नेसाई (सां जुझे दि आरियल) येथे गेलेले असतांनाचे निमित्त साधून राजकारण्यांच्या चिथावणीने त्यांच्यावर पूर्वनियोजित आक्रमण करण्यात आले आहे. या आक्रमणात गुंतलेल्या गुन्हेगारांवरील गुन्हे कदापि मागे घेऊ नयेत, तर लोकशाहीवरच आक्रमण करण्याचे धाडस करणार्या या लोकांना कडक शासन करावे, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडी करत आहे.