‘बिंदूदाबन-उपचार शिबिरा’त सहभागी होण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि शिबिराच्या वेळी जाणवलेली सूत्रे !

४.८.२०२३ ते ६.८.२०२३ या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन-उपचार शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. साधिकेला बिंदूदाबन शिबिराला जाण्यापूर्वी झालेले त्रास आणि शिबिराच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. काव्या किरण दुसे

१. बिंदूदाबन-उपचार शिबिरासाठी निवड झाल्याचे कळल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे

‘वर्ष २०१९ मध्ये ‘मला बिंदूदाबन शिकायचे आहे’, असे मी सद्गुरु स्वाती खाडये यांना सांगितले होते. ४.८.२०२३ या दिवशी होणार्‍या बिंदूदाबन-उपचार शिबिरासाठी माझी निवड झाली असल्याचे कळल्यावर मला कृतज्ञता वाटली आणि ‘सद्गुरु अन् प.पू. गुरुदेव कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवत नाहीत’, याची मला जाणीव झाली.

२. शिबिराला जाण्यापूर्वी झालेले त्रास

२ अ. शिबिराला जाण्यापूर्वी शारीरिक त्रासांत वाढ होणे : शिबिराला जाण्यापूर्वी माझ्या शारीरिक त्रासांत वाढ होऊ लागली. माझ्या शरिरावर उष्णतेच्या गाठी आल्या. माझ्या कमरेवर मोठी गाठ आली आणि मला झोपणेही कठीण झाले. त्यावर औषधोपचार केले; परंतु वेदना थांबत नव्हत्या. माझ्या यजमानांनी (श्री. किरण दुसे यांनी) मला धीर दिल्यामुळे मी शिबिराला जाण्याचे ठरवले.

२ आ. शिबिराला जायला निघाल्यावर पुष्कळ डोके दुखणे आणि सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर डोकेदुखी थांबणे : शिबिराला जायला निघाल्यावर ‘जणूकाही डोक्यावर कुणीतरी कुर्‍हाड मारत आहे’, अशा प्रकारे मला वेदना व्हायला लागल्या. नामजपादी उपाय करूनही माझ्या वेदना थांबत नव्हत्या. शेवटी मी सद्गुरु स्वातीताईंना मला होणार्‍या त्रासांविषयी लघुसंदेश पाठवला. त्यानंतर ५ मिनिटांत माझ्या शरिरावरील गाठ फुटली. मी त्यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केले. त्यामुळे माझी डोकेदुखी थांबली. त्या वेळी माझ्याकडून सद्गुरु ताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि माझी भावजागृती झाली.

३. शिबिराच्या वेळी जाणवलेली सूत्रे

अ. शिबिराच्या तिन्ही दिवशी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

आ. शिबिरात उपचार घेतल्यावर काही रुग्ण-साधकांना बरे वाटले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.

इ. निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी साधक-रुग्णांवर बिंदूदाबन करण्यापूर्वी साधकांवर वाईट शक्तीचे आवरण आलेले असायचे; परंतु बिंदूदाबन केल्यावर साधकांवरील आवरण न्यून होऊन त्यांना बरे वाटत होते.

ई. डॉ. दीपक जोशी यांच्यातील भावामुळे ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच साधकांवर बिंदूदाबनाचे उपचार करत आहेत’, असे मला जाणवले.

‘प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्या कृपेने मला या शिबिरात सहभागी होता आले अन् शिकण्यातील आनंद घेता आला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. काव्या किरण दुसे, कोल्हापूर सेवाकेंद्र (१०.९.२०२३)


उतारवयातही शिकण्याची वृत्ती असलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ८१ वर्षे)!

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

‘या शिबिराला पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेआजी (सनातनच्या १०९ व्या संत) यांची वंदनीय उपस्थिती लाभली. वयाच्या ८१ व्या वर्षी ३ दिवस शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहून त्यांनी ही बिंदूदाबन-उपचारपद्धत शिकून घेतली आणि सर्वांच्या समवेत सराव केला. त्यातून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली.’

– सौ. काव्या किरण दुसे, कोल्हापूर सेवाकेंद्र (१०.९.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.