Gyanvapi Case Verdict : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा चालूच रहाणार !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाचा आक्षेप फेटाळला !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये हिंदूंना मिळालेला पूजा करण्याचा अधिकार कायम रहाणार आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या पूजेच्या विरोधात मुसलमान पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या संदर्भात मुसलमान पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. या तळघरात वर्ष १९९३ पासून पूजा करण्यास मनाई होती. त्यापूर्वी येथे पूजा चालू होती. ३१ जानेवारी या दिवशी वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंना व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला होता. तेव्हापासून येथे पूजा चालू करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी दिली.

अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने उच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना म्हटले होते की, तळघर आमच्या अखत्यारीत बराच काळ आहे. हा ज्ञानवापीचा एक भाग असून जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार एक आठवड्याचा वेळ असतांना घाईघाईने पूजा सुरू केली. तळघरातील ही पूजा त्वरित थांबवावी.

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५ फेब्रुवारी या दिवशी या संदर्भातील निर्णय राखून ठेवला होता.