पंतप्रधान मोदी यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेचे घेतले दर्शन !  

गांधीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी या वेळी ४८ सहस्र कोटी रुपांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले.  या वेळी त्यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन द्वारकेचे ‘स्कूबा डायव्हिंग’द्वारे जाऊन दर्शन घेतले. ‘स्कूबा डायव्हिंग’ हा पाण्याखाली पोहण्याचा एक प्रकार आहे. यासाठी विविध उपकरणे वापरली जातात. साधारणतः समुद्राखालील जीवसृष्टीचा अभ्यास किंवा समुद्राखालील पर्यटनासाठी त्याचा वापर केला जातो.

सौजन्य : रिपब्लिक भारत 

समुद्रात खोलवर गेल्यावर मला देवत्वाचा अनुभव आला ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारकानगरीचे दर्शन केले. समुद्रात खोलवर गेल्यावर मला देवत्वाचा अनुभव आला. मी द्वारकाधीशासमोर नतमस्तक झालो. मी माझ्यासोबत मोरपंख घेऊन गेलो होतो. तो मी श्रीकृष्णाच्या चरणी ठेवला. प्राचीन द्वारकानगरीच्या अवशेषांना स्पर्श करण्याची मला नेहमीच उत्सूकता होती. या दर्शनानंतर मी भावविभोर झालो आहे.

देशातील सर्वांत मोठ्या ‘केबल ब्रिज’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

(‘केबल ब्रिज’ म्हणजेे खांबांऐवजी मोठ्या तारांद्वारे उभारण्यात आलेला पूल)

द्वारका येथे ४.७७ किलोमीटर लांबीच्या ‘सुदर्शन सेतू’ या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी या दिवशी उद्घाटन करण्यात आले. हा भारतातला सर्वांत लांब ‘केबल ब्रिज’ आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ९७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ओखा आणि बेट द्वारका यांना हा पूल जोडतो. ऑक्टोबर २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाच्या बांधकामासाठीचे भूमीपूजन केले होते. या पुलाची रुंदी २७.२० मीटर इतकी असून यावर ४ पदरी रस्ता आहे. या रस्त्याच्याही दोन्ही बाजूला साधारणपणे अडीच मीटर लांबीचे पदपथ आहेत. यातील पदपथाच्या बाजूला श्रीमद्भगवद्गीतेतील श्‍लोक आणि भगवान श्रीकृष्णाची चित्रे लावण्यात आली आहेत. याच पुलाच्या जवळ भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरही आहे.

सौजन्य : डीडी न्यूज