|
पैठण – ‘चहापाण्याचा व्यय द्या, मी खिडकीतून तुम्ही सांगणार त्या विद्यार्थ्याला कॉपी पुरवतो. पोलीस माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण नाही…..’ असे इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तरुणाने एका दैनिकाच्या प्रतिनिधीला सांगितले. पैठण तालुक्यातील दावरवाडीच्या न्यू हायस्कूल येथे २३ फेब्रुवारी या दिवशी मराठीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी तो आला होता. सकाळी ११ वाजता मराठीच्या पेपरला प्रारंभ झाला. परीक्षा केंद्राची भिंत ओलांडून अनेक जण विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत होते.
नियमानुसार एका बेंचवर एक विद्यार्थी पाहिजे; मात्र एका बेंचवर २ विद्यार्थी होते. ते एकमेकांची उत्तरे पाहून पेपर सोडवत होते. पर्यवेक्षकासमोर हा प्रकार चालू होता. या परीक्षा केंद्रावर चालू असलेल्या कॉपीच्या प्रकाराविषयी न्यू हायस्कूलचे प्राचार्य डी.बी. हजारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आमच्या केंद्रात कॉपी करण्यात येत नाही. असा प्रकार झाला असेल, तर मी चौकशी करतो अन् यापुढे कॉपी होणार नाही, त्यासाठी सूचना देण्यात येतील.’’
कॉपी देणार्याला पोलीस म्हणाले, सावकाश जा !परीक्षा केंद्रावर ४ पोलीस कर्मचारी होते. त्यांच्यासमोर अनेक जण परीक्षा केंद्रात जाऊन कॉप्या पुरवत होते. काहींना तर पोलीस स्वत: सूचना देत होते, ‘खिडकीवर चढू नका, सावकाश जा.’ ‘हे साहेबांचे महाविद्यालय आहे. येथे एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही. ते वर्गातील शिक्षकांना आधीच सांगून ठेवतात…’ असे ही एका पालकांनी सांगितले. परीक्षा वरच्या मजल्यावर चालू होती. बाहेरून कॉप्या पुरवणारे तरुण येथे गर्दी करत होते. त्यावर ‘बाहेरून कॉप्या कशाला देता रे, आतमध्ये सर्व व्यवस्थित चालू आहे’, असे शिक्षक कॉपी पुरवणार्यांना सांगत होते. प्रश्नपत्रिका हातात पडताच एकमेकांची उत्तरे पाहून विद्यार्थी पेपर लिहित होते. ‘आवाज करू नका, शांततेत पेपर लिहा,’ अशी सूचना पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना करत होते. |
संपादकीय भूमिकाशैक्षणिक क्षेत्रातील अनैतिकता गंभीर आहे. असे विद्यार्थी पुढे देशाचे आदर्श ठरतील का ? त्यामुळे असे प्रकार न होण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह शिक्षकांवर बडतर्फ आणि फौजदारी कारवाई केली पाहिजे ! |