पुणे – बारावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना राज्य मंडळांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र न दिल्यास संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांवर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. परीक्षा झाल्यानंतर संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम येत्या दोन वर्षांनंतर पालटण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यात दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निश्चित केले आहे; मात्र राज्य सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर आता भाष्य करू शकत नाही, असे गोसावी यांनी सांगितले.