रावी नदीवर बांधलेल्या शाहपूर कंदी धरणामुळे यापुढे पाकला पाणी मिळणार नाही !

जम्मू-काश्मीरमधील शेतकर्‍यांची मागणी ४४ वर्षांनंतर पूर्ण होत आहे !

कठुआ (जम्मू-काश्मीर) – सिंधू जल करारानुसार रावी नदीच्या संपूर्ण पाण्यावर भारताचा अधिकार आहे, तरीही रावीचे काही पाणी पाकिस्तानात जात होते. पाकिस्तानात वाहणारे रावीचे पाणी ‘शाहपूर कंदी धरण’ बांधून सिद्ध झाल्याने आता अडवले जाणार आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि पंजाब येथील अनुमाने ३७ सहस्र हेक्टर ओसाड भूमीवर हिरवळ पसरणार आहे. यापैकी ३२ सहस्र हेक्टर भूमी ही केवळ जम्म-काश्मिरातील आहे. शाहपूर कंदी धरण रणजित सागर धरणाच्या खाली ११ किलोमीटरवर बांधण्यात आले आहे.

सौजन्य Diplomacy Affairs

वर्ष १९७९ मध्ये या नदीवर रणजित सागर धरण बांधले जात असतांना जम्मू-काश्मिरातील शेतकर्‍यांनी त्यांनाही नदीचे पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी दुर्लक्षच केले होते. वर्ष २०१४ मध्ये म्हणजे तब्बल ३५ वर्षांनी केंद्रशासनाने या मागणीला मान देत नदीवर आणखी एक धरण बांधण्याची घोषणा केली. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सातत्याने रावी नदीवरील धरणाचे सूत्र उपस्थित केले.

२५ फेब्रुवारीपासून धरणात पाणी सोडण्यास चालू होणार !

केंद्र सरकारच्या सहकार्याने वर्ष २०१८ मध्ये चालू झालेल्या शाहपूर कंदी प्रकल्पाचे  काम पूर्ण झाले आहे. २५ फेब्रुवारीपासून धरणात पाणी सोडण्यास चालू केले जाणार आहे. त्यानंतर हे पाणी रावी-तावी कालव्याद्वारे शेतात पोचवले जाईल. या प्रकल्पातून २०० मेगावॅट वीज निर्मितीचेही उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी अनुमाने २ सहस्र ७९३ कोटी रुपये खर्च आला आहे.

कृत्रिम तलाव बनवण्यात येणार !

पाणी साठवणुकीचे काम चालू झाल्यानंतर येथे एक कृत्रिम तलाव आकार घेईल आणि त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाब येथील कालव्यांद्वारे शेतांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे कठुआ, हिरानगर आणि सांबा येथील नापीक भूमी सिंचनाखाली येणार आहे. याद्वारे तेथील शेतातही हिरवळ पसरेल.

संपादकीय भूमिका 

केंद्र सरकारला एकजात शेतकरीविरोधी म्हणणार्‍या काँग्रेसला आता यावरून शेतकरीद्वेषी म्हणायचे का ?