Assam Muslim Marriage Act : आसाममध्ये ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित !

समान नागरी कायद्याच्या दिशेने आसामधील भाजप सरकारची वाटचाल !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाम सरकारने ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित केला आहे. ‘आता राज्यातील सर्व विवाह ‘विशेष विवाह कायद्यां’तर्गत होतील. हा निर्णय बालविवाह बंद करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे’ असे सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कायदा रहित करण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आली.

मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देतांना मंत्री जयंत मल्लबरुआ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘आम्ही समान नागरी संहितेचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असलेला ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा’ आज कालबाह्य झाला आहे. हा कायदा रहित झाल्यामुळे बालविवाहावर बंदी येणार असून २१ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले पुरुष आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना विवाह करण्याची अनुमती मिळणार आहे.’

संपादकीय भूमिका

जे आसाममधील भाजप सरकारला जमते, ते भाजप शासित केंद्र आणि अन्य राज्ये यांनाही जमले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !