कोल्हापूर – मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक, अपायकारक अशा ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’ या उत्तेजक द्रव्याची विक्री करणारे व्यायामशाळेचे मालक प्रशांत मोरे आणि कामगार ओंकार भोई या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’च्या ६४ बाटल्या, इंजेक्शन असा ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आजची तरुण पिढी ही व्यसनांच्या आहारी जात आहे आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात. ही अत्यंत गंभीर गोष्ट असून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही व्यायामशाळेत ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’ या घातक औषधांची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली. या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २ पथके सिद्ध करून ही कारवाई करण्यात आली. कळंबा रस्त्यालगत असलेल्या ‘एस् प्रोटीन्स’ या दुकानात आणि सुर्वेनगर येथील ‘एस् फिटनेस’ या व्यायामशाळेवर धाड घातली असता ‘मेफेनटेरमाईन सल्फेट’ विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले.
संपादकीय भूमिकाराज्यात सध्या ठिकठिकाणी अमली पदार्थ-उत्तेजक द्रव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे आणि राज्यातील तरुण पिढी त्यात उद्ध्वस्त होत आहे. तरी सरकारने कठोरपणे कारवाई करून याची पाळेमुळे खणून काढावीत ! |