मीरा-भाईंदर येथील सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाने दिली अनुमती !

पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील आधी नोंदवलेल्या गुन्ह्यांचे कारण देत नाकारली होती अनुमती !

मुंबई – मीरा-भाईंदर येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती. या प्रकरणी भाईंदर येथील नरेश निळे यांनी मोर्चा आणि सभा यांसाठी अनुमती मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्त्यांद्वारे याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २३ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने कार्यक्रमांना अनुमती दिली.

आमदार टी. राजा सिंह

नरेश निळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीच्या दिवशी मिरवणूक काढून सभेसाठी अनुमती मागितली होती; मात्र ‘शिवजयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारीला पंतप्रधान येणार असल्याने ही सभा पुढे ढकलावी’, अशी विनंती पोलिसांनी आयोजकांना केली. त्यानंतर निळे यांनी ‘२५ फेब्रुवारी या दिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत भाजप आमदार श्री. टी. राजासिंह सहभागी होणार आहेत आणि सभा घेण्यासाठी अनुमती द्यावी’, असे आवेदन केले होते. त्यावर पोलिसांनी ‘श्री. राजासिंह यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत, तसेच मीरा-भाईंदर येथे एक महिन्यापूर्वी दंगल झाली होती’, या कारणाने मिरवणूक अन् सभा यांसाठीची अनुमती नाकारली.

यामुळे निळे यांनी अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता विनोद सांगवीकर यांच्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयात ‘मिरवणूक अन् सभेला अनुमती मिळावी’, यासाठी याचिका केली. यावर २३ फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी अधिवक्त्यांनी युक्तीवाद केला आणि ‘यामुळे मूलभूत अधिकारांचे हनन होते’, असे सांगत मिरवणूक अन् सभा यांना अनुमती द्यावी’, अशी मागणी केली. यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे-मोहिते आणि न्यायमूर्ती दिघे यांनी मिरवणूक अन् सभा घेण्याची अनुमती देण्याचे आदेश पोलिसांना दिले. या प्रकरणी अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांना अधिवक्ता खुश खंडेलवाल आणि अधिवक्ता विनोद सांगवीकर यांनी साहाय्य केले.