वस्‍त्रसंहिता !  

वस्‍त्रसंहिता

विवाह समारंभांमध्‍ये एकूणच बडेजाव, आपल्‍या श्रीमंतीचा दिखावा करण्‍याचे प्रस्‍थ सध्‍या पुष्‍कळ प्रमाणात वाढले आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून विवाह सोहळ्‍यातील प्रत्‍येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्‍या पोशाखांचे नियोजन करण्‍यात येते, उदाहरणार्थ हळदीच्‍या कार्यक्रमासाठी पिवळे कपडे, मेहंदीच्‍या कार्यक्रमासाठी सर्वांनीच हिरवे किंवा शेवाळी रंगाचे, सीमांत पूजनाला सर्वांनी पारंपरिक वस्‍त्रे घालणे इत्‍यादी थोडक्‍यात काय तर या सर्व समारंभांसाठी एक प्रकारे ‘वस्‍त्रसंहिता’ (ड्रेस कोड) ठेवण्‍यात येते. कार्यक्रमांमध्‍ये सहभागी होणारा मित्रपरिवार, नातेवाईक हेही ही ‘वस्‍त्रसंहिता’ आनंदाने स्‍वीकारतात; परंतु काही वेळा वस्‍त्रसंहितेची प्रथा काहींना अडचणीची ठरू शकते.

एका मुलाच्‍या वाढदिवसासाठी त्‍याच्‍या पालकांनी ‘ड्रेस कोड’ ठरवला. त्‍या कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी निमंत्रित पालकांना त्‍यांच्‍या पाल्‍यांसाठी, तसेच स्‍वतःसाठी नवीन ड्रेस किंवा पोशाख खरेदी करावे लागले. तेही त्‍याच दिखाऊ संस्‍कृतीचे पाईक असल्‍यामुळे त्‍याचे त्‍यांना विशेष काही वाटले नाही; मात्र दुसर्‍या बाजूला गेल्‍या मासात महाराष्‍ट्रातील अनेक मंदिर संस्‍थानांनी मंदिर प्रवेशासाठी वस्‍त्रसंहिता लागू करणार असल्‍याचे घोषित केले, तेव्‍हा मात्र पाश्‍चात्त्य विकृतीचा पुरस्‍कार करणारे पुरोगामी किंवा जन्‍महिंदू यांनी ‘मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता आवश्‍यक आहे का ? हे नवीन फॅड कशासाठी ?’, ‘धर्माचा अतिरेक होत आहे’, अशा प्रकारच्‍या अनेक प्रतिक्रिया नोंदवून मंदिर संस्‍थानांच्‍या या निर्णयाला विरोध केला. विवाह समारंभात, तसेच वाढदिवसाच्‍या कार्यक्रमात ‘ड्रेस कोड’ ठरवून निमंत्रितांनाही तशा प्रकारचा पोशाख खरेदी करावा लागतो. यामध्‍ये यांना काहीच गैर किंवा वावगे वाटत नाही.

का ? कि आपण ‘ड्रेस कोड’नुसार पोषाख परिधान केले नाहीत, तर आपली सामाजिक प्रतिमा डागाळण्‍याची भीती वाटते. प्रतिमेपोटी संस्‍कृती, परंपरा यांत शिरलेल्‍या उपरोक्‍त विकृतींना विरोध करण्‍याचे धाडस होत नाही, असेही काही जण निश्‍चितच असतील. फक्‍त हिंदु धर्माशी निगडित सूत्रांमध्‍ये हस्‍तक्षेप करत विरोध किंवा नापसंती दर्शवणे हाच मोठेपणा, ‘वैचारिक उंची’ असे वाटणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. खरेतर मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यामागे मंदिराच्‍या परिसरात सात्त्विकता टिकून रहावी, हा प्रमुख उद्देश आहे. अपेयपान, अभक्ष्यभक्षण, अनावश्‍यक चर्चा हे मंदिरात न करता सात्त्विक पोषाख, देवतेचा नामजप करणे, भजने ऐकणे यांसारख्‍या कृती मंदिरात सात्त्विक वातावरण रहाण्‍यास साहाय्‍यभूत ठरतात. मंदिरातील धर्माचरणाची ही आचारसंहिता आहे. मंदिरांमध्‍ये लागू होणार्‍या वस्‍त्रसंहितेला विरोध करणारी, म्‍हणजे संस्‍कृतीरूपी वटवृक्षाला लागलेली ही बांडगुळे काढायलाच हवीत !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.